Wednesday, August 19, 2026
Homeक्राईमAhilyanagar : ‘तोफखाना’ एमडी प्रकरणात तपासावरच संशयाची सावली

Ahilyanagar : ‘तोफखाना’ एमडी प्रकरणात तपासावरच संशयाची सावली

‘मोठ्या माशांना’ अभय || संशयितांची चौकशी होऊनही अटक का नाही?

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अंमली पदार्थमुक्त नगरचा नारा देत जिल्हा पोलिसांकडून कारवाया सुरू असतानाच, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या 155 ग्रॅम एमडी ड्रग्स प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह आहे. संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांच्या हाती लागलेल्या वाहनातून एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत 10 संशयित निष्पन्न होऊन सातजणांना अटक झाल्याचे सांगितले जात असले तरी, वाहनाचा मालक, एका माजी नगरसेवकाचा मुलगा आणि अन्य काही संशयितांची नावे समोर येत असतांनाही त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, काही व्यक्तींपर्यंत पोलीस पोहोचले; मात्र तडजोडीमुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही, असा दावा आहे. सावेडीतील मिस्कीन मळा परिसरात तोफखाना पोलिसांना संशयास्पद वाहन आढळले. वाहनातील तरूणांची चौकशी आणि झडती घेतल्यानंतर त्यामध्ये एमडी ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करून काहीजणांना अटक केली. तपासात काही आरोपींच्या घरझडतीमध्येही अमली पदार्थ आढळल्याचे सांगितले जाते. मात्र, ज्या वाहनाचा वापर ड्रग्सच्या वाहतुकीसाठी झाल्याचे तपासात समोर आले, त्या वाहनाच्या मालकाची भूमिका नेमकी काय? त्याची चौकशी झाली असल्यास त्याच्याविरूध्द गुन्ह्यात आरोपी म्हणून कारवाई का करण्यात आली नाही? या प्रकरणात एका माजी नगरसेवकाच्या मुलाचा सहभाग असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आल्याचा दावा केला जात आहे.

संबंधित व्यक्तीपर्यंत तोफखाना पोलिसांचे पथक पोहोचले असल्याचेही सांगितले जाते. तसेच पुणे येथील दोन व्यक्तींपर्यंतही पोलिसांचा तपास पोहोचल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना आरोपी का करण्यात आले नाही, त्यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य करीत आहेत. एक पोलीस उपनिरीक्षक आणि काही मर्जीतील अंमलदार तपासात सहभागी असल्याचे सांगितले जाते. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासमोर या प्रकरणाचा संपूर्ण तपास अहवाल ठेवण्यात आला आहे का? ठेवला असल्यास, संशयितांवर कारवाई न करण्यामागील कारणे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहेत का? हा मुद्दाही आता महत्त्वाचा ठरला आहे. एमडीसारख्या गंभीर प्रकरणात तपासातील प्रत्येक दुवा तपासला गेला आहे का, कोणत्या व्यक्तींची चौकशी झाली, कोणाला आरोपी करण्यात आले, कोणाला का वगळण्यात आले आणि उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण कसे झाले, याची पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतंत्रपणे तपासणी केल्यास या प्रकरणाभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तर मिळू शकते.

‘ड्रग्समुक्त अहिल्यानगर’च्या मोहिमेला धक्का
केंद्र आणि राज्य सरकारकडून अंमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली जात आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ड्रग्सविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ड्रग्सविरोधी मोहिमेबाबत सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडूनही अहिल्यानगर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, एका बाजूला जनजागृती रॅली, मोहिमा आणि कठोर कारवाईचा संदेश; तर दुसर्‍या बाजूला गंभीर एमडी प्रकरणातील तपासातील संशयास्पद बाबी अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतून 6380 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरींचा जोर वाढल्याने निळवंडे धरणातून 6380 क्युसेकने...