Saturday, November 23, 2024
Homeनगरभानुदास मुरकुटे यांना न्यायालयीन कोठडी

भानुदास मुरकुटे यांना न्यायालयीन कोठडी

रक्तदाब वाढल्याने ससून रुग्णालयात दाखल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची काल पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, बुधवारी रात्री त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील एका 35 वर्षीय महिलेवर अनेक आमिषे दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दि. 7 ऑक्टोबर श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवार, दि. 8 रोजी न्यायालयाने त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. काल पोलीस कोठडीची मुदत संपली असल्याने त्यांना राहुरी न्यायालयात हजर करणार होते. मात्र, मुरकुटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांची थेट पुण्यातून दुरदृष्य प्रणाली यंत्रणेच्या माध्यमातून राहुरी न्यायालयात हजेरी लावली.
यावेळी न्यायालयात सरकारी पक्षाने मुरकुटे यांच्याकडून तपासासाठी सहकार्य होत नसल्याचे सांगून त्यांच्या वैद्यकीय कोठडीची मागणी केली. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांनी कायद्यात फक्त पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी अशी तरतूद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व अटक केल्यानंतर तीन दिवस पोलिसांना पुरेसा वेळ मिळालेला आहे. मुरकुटे हे तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यावर दोन्ही पक्षामध्ये जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर न्या. आदित्य शिंदे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून मुरकुटे यांना विनाशर्त न्यायालयीन कोठडी सुनावली.

मुरकुटे यांना न्यायालयीन कोठडी मिळताच त्यांच्या वकिलांनी तात्काळ त्यांच्या जामिनासाठी न्यायालयापुढे अर्ज ठेवला. मात्र तपासी अधिकार्‍यांनी आपला अभिप्राय देण्यासाठी वेळ मागून घेतल्याने हा जामीन अर्ज मंजूर झाला नाही. त्यानंतर वकिलांनी लगेच अंतरिम जामिनासाठी दुसरा अर्ज दाखल केला. त्यावर रात्री 10 वाजता दोन्ही बाजुचा युक्तीवाद झाला. गुरूवारी रात्री 11.10 वाजता न्यायालयाने अंतरिम जामीनाचा अर्जही फेटाळला. त्यामुळे अजून काही दिवस मुरकुटे यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. मुरकुटे यांच्यावतीने महेश तवले, सुमित पाटील, सुभाष चौधरी, उमेश लटमाळे, ऋषिकेश बोर्डे, महेंद्र आढाव, राहुल बारस्कर आदी वकीलांनी काम पाहिले. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता सविता गांधले व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बाजू मांडली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या