अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तरुणावर दाखल केलेला अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित तरुणीला शिवीगाळ करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल गणेश कव्हाणे (वय 37 रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) व शिवम ज्ञानदेव काळे (वय अंदाजे 24 रा. झापवाडी, सोनई, ता. नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी तरुणी अहिल्यानगर शहरातील एका उपनगरात राहते. तिने काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पद्माकर दरंदले (वय 37 रा. कॉलेज रस्ता, सोनई, ता. नेवासा) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुलचे नातेवाईक अमोल कव्हाणे व शिवम काळे यांना फिर्यादी ओळखत असून राहुल विरोधात गुन्हा दाखल केल्यापासून ते दोघे फिर्यादीवर राग धरून आहेत. फिर्यादी वापरत असलेल्या इंस्टाग्राम आयडीवर त्यांना 1 डिसेंबर रोजी केस मागे घेण्यासाठी धमकीचा मेसेज आला. सदर आयडीवर शिवम काळे याचा प्रोफाईल फोटो होता.
तसेच 11 डिसेंबर रोजी रात्री फिर्यादीला त्यांच्या इंस्टाग्रामवर अमोल कव्हाणे याच्या इंस्टाग्रामवरून फोन येत होते. फिर्यादी यांनी एक फोन उचलला असता अमोल कव्हाणे बोलत होता. त्याने राहुल दरंदलेवर दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी धमकी दिली. केस मागे घे नाही तर तुला जिवंत सोडणार नाही व माझ्याकडे पेनड्राईव्ह असून तो सगळीकडे पब्लिश करेन, तसेच राहुल दरंदले सोबत असलेले फोटो, व्हिडीओ सगळीकडे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने केलेल्या फोनचे फिर्यादीने स्क्रीन रेकॉर्डिंग केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.