नाशिक | प्रतिनिधी
पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना सरसकट स्थगिती देऊन त्यातील अनेक कामे विद्यामान सरकारने रद्द केली व काही कामांना पुन्हा नव्याने मंजुरी दिली. मात्र, पर्यटन विभागाच्या कामांवर निर्णय घेतला नव्हता. ना ती कामे रद्द केली होती ना त्या कामांवरील स्थगिती उठवली होती. पर्यटन विभागाच्या १३२६ कोटींच्या कामांपैकी केवळ ५० कोटींच्या कामांवरील स्थगिती मार्च २०२३ मध्ये उठवली होती.
आता पर्यटनविकास मंत्रालय गिरीश महाजनांकडे आल्यानंतर पर्यटन विकास विभागाने २०४ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली आहे. नाशिक जिल्ह्यातील ९० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्यात आल्याने निफाड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील कामांना आता वेग येणार आहे.
महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राज्यात आलेल्या महायुती सरकारने एप्रिल २०२१ नंतर मंजूर केलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. त्यात पर्यटन विभागाच्या १३२६ कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. महाविकास आघाडी सरकार पडणार दिसू लागताच तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा अधिक कामांना मंजुरी दिल्याची चर्चा होती. यामुळे नव्याने आलेले पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या कामांवरील स्थगिती उठवण्याबाबत फारसा उत्साह दाखवला नाही.
एकीकडे डिसेंबर २०२२ पर्यंत बहुतांश विभागांनी स्थागिती दिलेली कामे एकतर रद्द केली किंवा त्यांच्यावरील स्थगिती उठवली होती. मात्र, मंगलप्रभात लोढा याबाबत काहीही निर्णय घेत नव्हते. त्यांनी २ नोव्हेंबर २०२२ ला २९२ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली. मात्र, त्यानंतर पंधरा दिवसांतच १६ नोव्हेंबरला तो शासन निर्णय मागे घेतला.
यामुळे या कामांच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त होत होती. दरम्यान त्यांनी मार्च २०२३ मध्ये या १३२६ कोटींच्या कामांपैकी केवळ ५० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला होता. उर्वरित कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी ठेकेदारांकडून मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करूनही स्थगितीबाबत काहीही निर्णय होत नव्हता.
दरम्यान महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सामील झाल्यानंतर मंत्रालयांचे फेरवाटप झाले. त्यात पर्यटन विकास विभाग गिरीश महाजन यांच्याकडे आला. यामुळे या कामांवरील स्थगिती उठण्याची आशा निर्माण झाली होती. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे त्यांनी राज्यातील निवडक २०४ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली आहे.