अमृतसर । Amritsar
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजीठा परिसरात रविवारी रात्री विषारी दारू प्रकरणात मोठी दुर्घटना घडली. मरारी कला, भंगाली कला, जयंतीपुर, थडीवाला आणि नंगल्ली या गावांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर आजारी आहेत. सध्या आजारी असलेल्या व्यक्तींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना रात्री उघडकीस आली, मात्र सोमवारी सकाळी काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजले. उर्वरितांना त्रास होऊ लागल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही मृतदेह गावकऱ्यांनी पोलिसांना न कळवता थेट अंत्यसंस्कारासाठी नेल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांनी एकाच ठिकाणाहून दारू विकत घेतली होती. त्या दारूत विषारी घटक आढळल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावांमध्ये शोककळा पसरली आहे. या गंभीर घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी साक्षी साहनी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी माहिती दिली की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे.