अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर तालुक्यातील चास शिवारातील एका हॉटेल व्यावसायिकाचे बंद घर चोरट्यांनी दिवसा फोडून सुमारे 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 20 हजारांची रक्कम असा चार लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला. सदरची घटना बुधवारी (26 जून) सकाळी 10 ते दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रात्री पावणे बारा वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास विश्वनाथ फलके (वय 57 रा. चास) यांनी फिर्याद दिली आहे. फलके यांनी त्यांचे राहते घर बुधवारी सकाळी 10 वाजता बंद केले होते. त्यानंतर चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील पाच तोळ्याचा सोन्याचा नॅकलेस, साडेतीन तोळ्याचा सोन्याचा राणीहार, पाऊण तोळ्याचे सोन्याचे कानातील टॉप्स, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी व 20 हजारांची रोकड असा चार लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सदरचा प्रकार दुपारी पावणे दोनच्या सुमारास उघडकीस आला. त्यानंतर फलके यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.
फलके यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रंजित मारग करत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यातील गावांत दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले असून गुन्ह्यांचा तपासही लागत नाही. घरफोड्या करणार्या टोळीला अटक करण्याची मागणी होत आहे.