अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील बेपत्ता व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (वय 68) यांचे 10 कोटींसाठी अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. ज्यांना पैशांच्या वसुलीचे काम दिले होते, त्यांनीच परदेशी यांचे बोल्हेगाव येथील घराबाहेरून अपहरण करून खून केल्याचे व निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत मृतदेह लपवल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मृतदेह लपवल्याची जागा दाखवली. तेथून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण बबन कोळपे (वय 38, रा. विळद, ता. नगर) व त्याचा साथीदार सागर गिताराम मोरे (वय 28, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मागील महिन्यात 24 फेब्रुवारीपासून परदेशी हे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी परदेशी यांचा शोध घेताना अनेकांचे जबाब नोंदवले होते. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यात तीन ठिकाणी संशयास्पदरित्या इंडिका कार जाताना दिसली. त्याचा तपास केल्यावर ही कार किरण कोळपे वापरत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी कोळपे व त्याचा साथीदार मोरे यांना ताब्यात घेतले. परदेशी यांनी विळद येथील चौघांना थकीत रकमेच्या वसुलीचे काम दिले होते. मात्र, त्यांना ती रक्कम वसूल करता आली नाही. त्यामुळे परदेशी यांच्याकडूनच पैसे उकळण्यासाठी त्यांच्या अपहरणाचा प्लॅन त्यांनी केला, असे जबाब दोघांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, दीपक परदेशी यांनी किरण कोळपे याला विळद गावातील जगताप, भुजबळ, खरमाळे, अडसुरे यांच्याकडे असलेल्या थकीत रकमेच्या वसुलीचे काम दिले होते. या कामासाठी किरण कोळपे याने त्याच्या मदतीला ब्राह्मणी येथील सागर मोरे याला बोलावून घेतले होते. मात्र, पैसे वसूल करणे अवघड असल्याने दीपक परदेशी यांचे अपहरण करून त्यांच्याकडून अधिक रक्कम वसूल करण्याचा प्लॅन त्यांनी केला. परदेशी यांना कारमध्ये बसवल्यावर किरण कोळपे याने परदेशी यांच्याकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली. सागर मोरे याने परदेशी यांचे दोन्ही हात सिटला पकडून ठेवल्याने परदेशी झटापट करत होते. मोरेने नायलॉन दोरीने परदेशी यांचा गळा आवळला. परदेशी यांनी कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे कोळपेने दोरीने परदेशी यांचे हात व पाय बांधले. निंबळक बायपास रोडवर कार थांबवून दोघांनी परदेशी यांचा गळा दोरीने आवळून कारमध्येच त्यांचा खून केला.
दोन्ही संशयित आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी, तर संशयित आरोपींच्यावतीने अॅड. महेश तवले व अॅड. संजय दुशिंग यांनी बाजू मांडली. संशयित आरोपींचा गुन्ह्याचा उद्देश काय, त्यांना खून करण्यासाठी कोणी सुपारी दिली आहे का, इतर साथीदार आहेत का, याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेली इंडीका कार जप्त करायची आहे, गुन्ह्याची पूर्वतयारी व कट कसा रचला, गुन्ह्यातील पुरावे हस्तगत करणे, संशयित आरोपींचे रक्ताचे व इतर नमुने घेणे, इतर कोणते वाहन व हत्यार वापरले का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे मिळाले धागेदोरे
स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी नायरा पेट्रोल पंप, बोल्हेगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयास्पद हालचाली दिसून आल्या. परदेशी हे दुचाकीवरून व नंतर त्यापाठोपाठ इंडिका कारला दोन ते तीन मिनिटांचा उशीर झाल्याचे आढळले. त्या आधारे तपास करत किरण कोळपे आणि सागर मोरे यांच्यावर संशय बळावला. गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी मृतदेह टाकलेल्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
व्यापारी संघटनेचे एसपींना निवेदन
व्यापारी दीपक परदेशी यांच्या हत्येमागे प्रमुख सूत्रधार कोण आहे याची सखोल चौकशी करावी, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी माणिक विधाते, सुरेश बनसोडे, संजय चोपडा, प्रमोद बोर्हाडे, मुकुंद रत्नापूरकर आदींसह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोळपे बडतर्फ पोलीस
किरण कोळपे हा जिल्हा पोलीस दलात कार्यरत होता. मात्र त्याचा दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने त्याच्यासह टोळीविरोधात ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस खात्यातून बडतर्फ केले. त्याच्याविरूध्द दरोडा, आर्म अॅक्ट, अत्याचार, फसवणूक अशा विविध कलमान्वये राहुरी, एमआयडीसी व कोतवाली पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्याने त्याचा पंटर मोरेच्या साथीने व्यापारी परदेशी यांचा खून केल्याचे समोर आले आहे.