अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
माळीवाडा, वसंत टॉकीजजवळील गुरू गणेश कॉम्पलेक्स मध्ये राहणार्या व्यापार्याच्या घराचे कुलूप चावीने उघडून अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण अंदाजे एक लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी (13 नोव्हेंबर) घडली. याप्रकरणी व्यापारी अंकित अमृतलाल कोठारी (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अंकित कोठारी हे आपल्या कुटुंबासह गुरू गणेश कॉम्पलेक्स मध्ये राहतात.
वसंत टॉकीज परिसरात त्यांचे सुपर मार्केटचे दुकान आहे. गुरूवारी दुपारी 1.30 वाजता कोठारी कुटुंब माऊली संकुल, सावेडी येथे भरतनाट्यम कार्यक्रमासाठी गेले. घराला कुलूप लावल्यानंतर चावी त्यांनी घराबाहेरील चप्पल स्टँडमधील शूजमध्ये ठेवली होती. कार्यक्रमस्थळी पत्नी व मुलांना सोडल्यानंतर कोठारी दुकानात परतले. दरम्यान, त्यांच्या शेजारी राहणार्या महिलेने फोन करून घराच्या कुलूपात चावी तशीच अडकलेली असल्याचे पत्नीला सांगितले. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता त्या महिलेने ती चावी कोठारी यांच्याकडे दुकानात आणून दिली.
सायंकाळी कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्नी-मुले रिक्षाने दुकानात आले आणि रात्री 9.15 वाजता ते सर्वजण घरी परतले. घराचे कुलूप उघडून आत गेल्यानंतर बेडरूममधील कपाट उघडे असल्याचे दिसले. तपासल्यावर कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम गायब झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये प्रत्येकी दोन तोळ्याचे दोन सोन्याचे चैन-पेंडल सेट, आठ ग्रॅमची सोन्याची चैन, सात ग्रॅमची सोन्याची चैन, पाच हजार रोख रक्कमेचा समावेश होता. चोरट्याने चावी मिळवून घराचे कुलूप उघडून आत प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने व पैसे चोरून नेल्याचा संशय आहे.




