नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील कुकाणा येथील व्यापार्याच्या दुकानासमोरुन दोन दुचाकीवरुन तीन क्विंटल तूर चोरुन नेलेल्या चौघांपैकी तिघांना मुद्देमालासह पकडण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या तिघांना न्यायालयात हजार केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात दिली. याबाबत कुकाणा येथील व्यापारी सतिष हरकचंद भंडारी (वय 56) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले की, दि.16 रोजी नेहमी प्रमाणे पहाटे 4 वाजेचे सुमारास मी उठलो व कॉम्पलेक्स समोर असलेले धान्य पाहणेसाठी गेलो असता माझे दुकानाजवळून दोन मोटारसायकलवर चार इसम धान्य घेवून पळून जाताना दिसले. खात्री करता तुरीचे धान्य अंदाजे 300 किलो चोरुन नेले आहे.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात कुकाणा गावातील आजोनाथ राजु तांबे हल्ली. रा. तरवडी, विजय दत्तात्रय घोडके रा-दहिगाव रोड कुकाणा, शाहरुख दगडु पठाण, रा. झोपडपट्टी, कुकाणा व भैय्या उर्फ नदीम निजाम अत्तार रा. कुकाणा या चौघांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. पेट्रोलिंग दरम्यान आरोपी आणि पोलिसांची समोरासमोर नजरा नजर झाली असता, आरोपी पळून जावू लागले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल हरी धायतडक व कॉन्स्टेबल संतोष खंडागळे यांनी पाठलाग करुन आरोपींना पकडले.
आरोपींकडून सदर गुन्ह्यात चोरलेल्या मालापैकी 6 हजार 600 रुपये किंमतीचे 100 किलो तुर धान्य, 20 हजार रुपये किमतीची एक बिगर नंबरची बजाज प्लॅटीना मोटारसायकल, 25 हजार रुपये किंमतीची बिगर नंबरची हिरो स्पेलंडर कंपनीची मोटार सायकल असा एकूण 51 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोलीस नाईक बी. बी. काळोखे, कॉन्स्टेबल हरी घायतडक, चालक कॉन्स्टेबल संतोष खंडागळे, कॉन्स्टेबल संदीप ढाकणे, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रसाळ आदींनी ही कारवाई केली आहे.