Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर करोनाचे सावट

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर करोनाचे सावट

मुंबई –

राज्यात करोना संकट असताना शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा होणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान

- Advertisement -

शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच असल्याचं शिवसेनेने सांगितलं आहे.

लोकांनी ईद साजरी केली नाही, सार्वजनिक गणेशोत्सवात संयम राखला. गणपती कधी आले व गेले ते समजलेच नाही. इतका फिका गणेशोत्सव इतिहासात कधी साजरा झाला नव्हता, पण संकटच असे गंभीर आहे की, आनंदास मुरड घालून सण-उत्सव साजरे करावे लागले आहेत. आता नवरात्री, दसरा, पाठोपाठ दिवाळी येत आहे. लगोलग नाताळ आणि नववर्षाचे आगमन आहेच. दसरा-दिवाळीत गर्दी तर होणारच. नवरात्रीच्या दांडियावर बंधने आलीच आहेत, पण शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही या क्षणी अधांतरीच आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

लाखो लोक विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर जमतात. महाराष्ट्रातला हा एक राजकीय, पण सांस्कृतिक उत्सवच असतो. अनेक वादळांत हा दसरा मेळावा आजपर्यंत झालाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असताना शिवसैनिकांच्या उत्साहास कसा बांध घालायचा हा प्रश्नच आहे. पण कायदा, नियमांचे पालन तर करावेच लागेल. छत्रपती शिवराय, आई जगदंबा जो मार्ग दाखवतील त्याच मार्गाने पुढे जावे लागेल. कायद्याच्या राज्याला गालबोट लागेल आणि त्यामुळे विरोधकांना टीकेचा दांडिया नाचवता येईल, असे काहीच घडणार नाही, असं शिवसेनेने सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या