Tuesday, May 21, 2024
Homeनंदुरबारसारंगखेडा तापी नदीवरील पुलावर भगदाड ; वाहतूक बंद

सारंगखेडा तापी नदीवरील पुलावर भगदाड ; वाहतूक बंद

सारंगखेडा | वार्ताहर Sarangkheda

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीला महापूर आहे. तसेच पुलाला भगदाड पडल्याने सारंगखेडा ता.शहादा येथील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल कधीही कोळसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, महापुरामुळे तापी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. तापी नदीला आलेला पूर बघण्यासाठी पुलाजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली. पुलावर पोलीस यंत्रणा उशिरापर्यंत पोहचली नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करून स्वतः टाकरखेडा येथील नागरिकांनी खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक थांबवलेली आहे. खान्देशात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. शहादा तालुक्यात गेल्या ३० तासापासून संततधार पाऊस सुरू आहे. तीन दिवसापासून पावसाने ऊसंत घेतलेली नाही. शहादा शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला आहे.

तालुक्यातील सर्व नद्या, नाले जोरदारपणे प्रवाहित झाले आहेत. शहादा शहरातील गल्लीबोळात नवीन वसाहतींमध्ये सर्वत्र पाण्याचे तलाव साचले आहेत. रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. ग्रामीण भागातदेखील संततधार पाऊस झाल्याने शेतामध्ये पाण्याचे मोठे तलाव साचले आहेत. या पावसामुळे भविष्यातील पाणीटंचाई जवळजवळ दूर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सारेच आनंदीत झाले आहेत.

तापी काठावरील गावांना सतर्कतेच्या इशारा दिला असून महापूर आल्याने काही पाण्याच्या विळख्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तापी नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढतच आहे. सारंगखेडा व प्रकाशा येथील दोन्ही बॅरेजचे पूर्ण दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तापी नदीला महापूर आल्यामुळे टाकरखेडा भागाकडील पुलावर मोठे पडले आहे. त्यामुळे हा पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, भगदाड पडल्याची माहिती दिल्यावरदेखील पोलीस यंत्रणा तात्काळ पोहचली नाही म्हणून नागरिक रोष व्यक्त करीत होते. तालुक्यातील गोमाई, सुसरी, वाकी, कणेरी तसेच म्हैस नद्यांना देखील पूर आलेले आहेत. प्रकाशाजवळ गोमाई नदीच्या पात्रात पाण्याच्या फुगवटा झाल्याने गौतमेश्वर मंदिरापर्यंत पाणी पोहचले आहे. उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

दरम्यान, दुपारी साडेचार वाजता जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल हे सारंगखेडा पुलाजवळ थांबून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत आहेत. पुलावरून कोणीही जाऊ नये असे देखील आवाहन करीत होते. रविवार हा सारंगखेडा येथील आठवडे बाजार असल्याने टाकरखेडा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी येत असतात. पुलावरून वाहतूक बंद केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या