Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : दोन बहिणींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

दुर्दैवी : दोन बहिणींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

मेरी लिंक रोडवरील मानेनगर (शुभम कॉलनी) परिसरात घराच्या गॅलरीतील पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्या चिमुरड्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १५) रात्री घडली. तृप्ती विशाल सोनवणे (वय ८) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (वय ६) अशी मृत बहिणींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेनगरातील शुभम कॉलनी येथे डॉ. विशाल सोनवणे यांचे वास्तव्य असून रासबिहारी-मेरी लिंक रोडवर त्यांचे क्लिनिक आहे. त्यांची पत्नीही वैद्यकीय व्यवसायात त्यांना मदत करतात. शनिवारी सायंकाळी सोनवणे दाम्पत्य क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करत असताना दोन्ही मुली घरी खेळत होत्या.रात्री एका रुग्णाला सलाईन लावण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिकमध्ये थांबवून घरी जात दोन्ही मुलींना जेवण दिले. ‘आई लगेच घरी येईल’, असे सांगून त्यांनी किचनचा दरवाजा उघडा ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून पुन्हा क्लिनिकमध्ये परतले.

काही वेळाने रुग्णाची सलाईन संपल्यानंतर डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिक बंद करून घरी जाण्यास सांगितले. त्या घरी पोहोचल्यानंतर कुलूप उघडून आत गेल्या. मात्र, दोन्ही मुली दिसून न आल्याने त्यांनी घरात शोधाशोध सुरू केली. यावेळी किचनलगतच्या गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

संशय आल्याने त्यांनी टाकीत डोकावून पाहिले असता एका मुलीचे केस पाण्यात दिसले. त्यांनी तातडीने तिला बाहेर काढले. त्यावेळी दुसरी मुलगीही टाकीतच असल्याचे आढळून आले. दोन्ही मुलींना बाहेर काढल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी पतीला फोन करून घटनेची माहिती दिली.घटनास्थळापासून अंतर असल्याने डॉ. सोनवणे यांनी शेजारी अमोल पोतदार यांच्यासह इतरांना तातडीने मदतीसाठी धाव घेण्यास सांगितले.

शेजाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलींना रात्री सुमारे १०.३५ वाजता अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर रात्री ११.१० वाजता दोन्ही मुलींना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने यांनी म्हसरूळ पोलिसांना कळविले. पोलीस हवालदार कवीश्वर खराटे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. रविवारी दुपारी दोन्ही बहिणींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्या

बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 12 भाविक जखमी

0
दिल्ली। Delhi पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध 'अशोक धाम' मंदिरात एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. मंदिरात शिवाभूमीत जलाभिषेक...