Saturday, October 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमतदान वेगात होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या!

मतदान वेगात होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे मागणी

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानासाठी जास्त वेळ लागत असल्याने मतदार नाराज झाले होते. मतदानासाठी लागलेल्या रांगांचे दृश्य पाहून अनेक मतदार घराच्या बाहेरच पडले नाही. त्यामुळे लोकसभेच्या मतदानावर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा वेग वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत आले आहे. आयोगाने आज येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ठाकरे गटाच्या वतीने सुभाष देसाई आणि खासदार अनिल देसाई यांनी राजीव कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या सूचना केल्या.

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अनेक ठिकाणी रांगा लागल्याने मतदान संथ गतीने सुरु होते. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ देऊ नका, अशी सूचना ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस मतदानासाठी लागलेल्या रांगा पाहून अनेक मतदार मतदानासाठी घराच्या बाहेरच पडले नाहीत. परिणामी मतदान कमी झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि वेगाने मतदान होण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या, म्हणजे मतदान वेगाने वाढेल. मतदारांची कुचंबणा होणार नाही. मतदारांचा उत्साह वाढेल यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करावेत, असे ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात एका किंवा दोन टप्प्यातच मतदान घेण्याची सूचना सुभाष देसाई यांनी केली. निवडणूक साहित्य, मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था अशा कारणांमुळे कधी कधी मतदान पाच-सहा टप्प्यात घेतात. पण यापूर्वी राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान झाले आहे. त्यामुळे यावेळेस राज्यात एका किंवा दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्याची सूचना ठाकरे गटाने केली. या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राजीव कुमार यांनी दिल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या