Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ २०२७च्या आर्थिक संधींसाठी उमेदच्या महिला बचतगटांचे प्रशिक्षण सुरू

सिंहस्थ २०२७च्या आर्थिक संधींसाठी उमेदच्या महिला बचतगटांचे प्रशिक्षण सुरू

नाशिक | जिमाका वृत्तसेवा

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या निमित्ताने उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या संधींचा स्थानिक महिला बचतगटांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘अनेक’ (Accelerating Nano Enterprises through Kumbh) उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत महिला बचतगटांसाठी पहिले क्षमता-विकास प्रशिक्षण सत्र ४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळा २०२७मुळे सुमारे २७ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज असून, या आर्थिक संधींमध्ये स्थानिक उद्योजकांचा अधिकाधिक सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या प्रशिक्षण सत्रात महिला बचतगटांच्या सदस्यांना सिंहस्थ काळातील संभाव्य व्यावसायिक संधी, व्यवसाय विस्ताराचे नियोजन, आर्थिक सक्षमीकरण तसेच व्यवसायाच्या प्रचारासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उमेदचे स्वप्नील शिर्के यांनी प्रास्ताविक करून महिला बचतगटांनी सिंहस्थासाठी आतापासूनच नियोजनबद्ध तयारी करण्याची गरज अधोरेखित केली. त्यानंतर दे आसरा फाउंडेशनच्या वैशाली अपराजित यांनी पुढील दोन वर्षांत राबविण्यात येणाऱ्या ‘अनेक’ उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट करत सहभागी उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सहाय्याची माहिती दिली.

सेतू ड चे अनुपम कुलकर्णी यांनी व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. कॉसमॉस बँकेच्या अधिकारी केतकी विसपुते यांनी बँकेच्या विविध योजना व आर्थिक सेवांची माहिती दिली. अनुप खंडेलवाल यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान उपलब्ध होणाऱ्या नव्या व्यावसायिक संधींवर प्रकाश टाकत महिला उद्योजकांनी आतापासूनच व्यवसायाची तयारी सुरू करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुंभेथॉन, नाशिकचे ऋषभ वोरा आणि यश मोरे यांनी सहकार्य केले. उमेदचे बंडु कासार, सिसोदिया आणि विजया शिरसाठ यांच्यासह अन्य अधिकारीही उपस्थित होते.

‘अनेक’ उपक्रमाअंतर्गत आगामी काळात व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, आर्थिक व्यवस्थापन, व्यवसाय नोंदणी, ब्रँडिंग, बाजारपेठेशी जोडणी तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध विषयांवरील प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार असून, त्याद्वारे स्थानिक महिला उद्योजक, बचतगट आणि पथविक्रेते यांना सिंहस्थ कुंभमेळा २०२७मधील आर्थिक संधींचा प्रभावी लाभ घेण्यासाठी सक्षम करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....