नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉ . मयूर पाटील यांची बदली झाली असून शासनाने त्यांना बढती देत त्यांची नवापूर नगर परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. आज गुरुवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागात महत्त्वाचे बदल करून शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई करून नागरिकांची मने जिंकली होती तर अतिक्रमण विभागाचे सिंघम म्हणून देखील त्यांचे छवी तयार झाली होती.
डॉ पाटील हे मागील सुमारे साडेचार वर्षांपासून नाशिक मनपात कार्यरत होते. मूळचे ते परसेवेतील अधिकारी होते. त्यांनी नवीन नाशिक विभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर मनपातील जाहिरात घोटाळा समोर आल्यानंतर त्यांच्याकडे जाहिरात व करसंकलन विभागाच्या प्रभारी उपायुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
शहरातील अतिक्रमणचा मुद्दा विधानसभेत गाजल्यानंतर अतिक्रमण उपायुक्त नितिन नेर यांच्याकडून हा पदभार काढून घेत डॉ .पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मागील दीड वर्षांपासून ते कामकाज पाहत होते. त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणावर बुलडोजर फिरवण्यात आल. त्यांनी नाशिक मनपात तीन वर्ष सेवेचा कालावधी पूर्ण झाला होता. मागील एक वर्षापासून ते बढतीच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाने त्यांना बढतीवर नवापूर नगरपरिषदेत पाठवले.