मुंबई | प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सरकारने गुरुवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची बदली अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची बदली मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तपदी झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात सह व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती झालेल्या वैदेही रानडे यांची बदली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांची बदली पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांची बदली अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार यांची बदली करून त्यांच्यावर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांची बदली अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, ठाणे येथे करण्यात आली आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूरचे सदस्य सचिव डॉ. अर्जुन चिखले यांची बदली सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई या पदावर झाली आहे.