अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर येथून जयपुर (राजस्थान) येथे पाठविलेला सहा लाख 24 हजार रूपये किंमतीचा 12 टन कांदा परस्पर दुसर्या ट्रान्सपोर्टला विकुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुरेंद्र भीमसिंग पुनीया (रा. कुलान, पो. धर्मुल कलान, ता. टोहाना, जि. फत्तेहबाद, हरीयाणा) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन अगीलाल चौधरी (वय 29 रा. नगली, पो. ठिमोली, ता. रामगेड संगम, जि. सिक्कर, राजस्थान, हल्ली रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सदरची घटना 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2024 दरम्यान घडली असून गुन्हा 6 जानेवारी 2025 रोजी दाखल झाला आहे. फिर्यादी चौधरी हे अहिल्यानगर एमआयडीसीतील दिल्ली- हरीयाणा रोड लाईन ट्रान्सपोर्ट येथे मॅनेजर आहेत. या ट्रान्सपोर्टमध्ये 15 ऑक्टोबर 2024 रोजी सुरेंद्र पुनीया हा मालट्रक (एचआर 62 ए 8406) घेऊन आला. मी राजधानी ट्रेडींग कंपनी मोहाना मंडी जयपूर येथे कांदा घेवुन जातो असे त्याने सांगितले.
फिर्यादी चौधरी यांनी त्याच्या ट्रकमध्ये सहा लाख 24 हजार रूपये किंमतीचा 12 टन कांदा पाठविला. दरम्यान, त्याने सदरचा कांदा जयपुर येथे खाली न करता परस्पर दुसर्या ट्रान्सपोर्टला विक्री केला. त्यानंतर चौधरी यांनी त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने कांदा परत केला नाही व पैसही दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे चौधरी यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार नेहुल करत आहेत.