देवळाली कॅम्प । वार्ताहर
देशभरात रेल्वेच्या ( Railway )माध्यमातून सर्व स्तरावरील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देताना देश आर्थिक सुबत्तेकडे नेण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारने केला असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचा सन्मान केला जात आहे.
भगूर येथील स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक सैनिक होते. त्यांचा आज मी सन्मान करत आहे, हे माझे भाग्य आहे. भगूरपुत्र विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत आपण पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधानांना साकडे घालणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve, Minister of State for Central Railway) यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मध्य रेल्वे व सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून भगूर येथील सावरकर वाड्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दानवे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते सावरकर वाड्याबाहेर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
वाड्यातील स्वा.सावरकर यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत त्यांनी अभिवादन करत वाड्याची पाहणी केली. यावेळी व्यासपीठावर खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, आ. अॅड. राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., स्वा. सावरकरांची नात अशिलता सावरकर राजे, सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर भगूरच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सचिन ठाकरे, कैलास गायकवाड, तानाजी करंजकर, तानाजी भोर, प्रसाद आडके, सतीश कांडेकर, मध्य रेल्वेचे अॅडिशनल डीआरएम रुकमैया मीना आदी उपस्थित होते.
यावेळी भगूर परिसरातील सुमारे 33 स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दानवे यांनी मध्य रेल्वेच्या माध्यमातून 75 स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांसाठी विशेष रेल्वे डब्याची व्यवस्था करण्यात येऊन त्यांना अंदमानाची सफर घडवून देण्याबाबत आश्वासन देताना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी योगदान देण्याचे आवाहन केले.
नाशिकचे रेल्वेप्रश्न मार्गी लावावे
नाशिकचा सर्वात महत्त्वाचा नाशिक-पुणे रेल्वे, किसान रेल्वे, कसारा घाटातील रेल्वेच्या अडचणी या प्रश्नांसह गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे सावरकरांचा पुतळा भगूर येथे उभारावा, अशी मागणी खा. हेमंत गोडसे यांनी यावेळी केली. आभार डॉ. प्रवीण कलाल यांनी मानले.