Thursday, November 21, 2024
HomeनाशिकBlog : बाबा काशी विश्वनाथ यांची नगरी बनारस अर्थात ‘वाराणसी’….; दीड दिवसांचा...

Blog : बाबा काशी विश्वनाथ यांची नगरी बनारस अर्थात ‘वाराणसी’….; दीड दिवसांचा शब्दबद्ध केलेला प्रवास

वाराणसी | कुंदन राजपूत

बाबा विश्वनाथची नगरी बनारस, काशी, वाराणसी यांसह असंख्य नावाने ओळखली जाते. पुराणातदेखील या शहराचा उल्लेख व संदर्भ आढळतात.

- Advertisement -

जगातील अतिप्राचीन शहर अशी विश्वेश्वराच्या नगरीची ओळख.  अलीकडे या शहराची अोळख सांगायची तर देशाचे पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ. ते या मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले तेव्हा ‘न मै आया हू, नहि किसिने मुझे लाया है. मुझे तो माॅ गंगा ने बुलाया है’ हे त्यांचे वाक्य खूप गाजले होते.

बाबा विश्वनाथचे मंदिर, मानवी जीवन संस्कृतीची सरिता गंगा नदी, तिच्यावरील पुरातन असे ऐंशी घाट, प्रत्येक घाट निर्मितीची एक अख्यायिका व वैशिष्ट, गंगा आरती यामुळे हे शहर वलयांकीत ठरते. काशी म्हणजे मोक्ष. त्यामुळे देशातील कानाकोपर्‍यातील भाविक विश्वेश्वरापुढे नतमस्तक होण्यासाठी येथे येतात.

दिड दिवस मी बाबा विश्वनाथच्या नगरीत मुक्कामी होतो. मी दाव्यानुसार सांगू शकतो जेवढे विदेशी भाविक काशीत येतात कदाचित तेवढ प्रेम देशातील दुसर्‍या शहराच्या वाटयाला येत नसेल.

काशीच्या रस्त्यांवर अगदी गल्ली बोळात विदेशी चेहरे लक्ष वेधून घेतात. या शहराबद्दल, येथील संस्कृतीबद्दल त्यांच्या चेहर्‍यावर प्रचंड कुतूहुलता दिसून येते. गोरे गोमटे चेहेरे,  त्यांच्या कपाळावर शोभून दिसणारा चंदनाचा टिळा व भस्म व रांगेत उभे राहून विशेष म्हणजे शिस्त पाळत बाबा विश्वनाथचे दर्शन घेतात. त्यांच्याकडे पाहून आपल्याला त्यांचे नवल वाटते.

अध्यात्म हा भाग वजा करा. पण पत्रकार म्हणून या शहराबद्दल जसे आकर्षण असते ते मलाही होते. मोदींचा मतदारसंघ कसा असेल. सीएम योगी आल्यापासून काशीचा कायापालट झाला हे ऐकले होते. त्यांच्या नमामी गंगे प्रोजेक्ट यासारखे असंख्य प्रश्न मनाला पडणे साहजिकच होते. त्यात काही गैर नाही.

एक दिवसाच्या प्रवासानंतर पहाटे  चारला वाराणसी रेल्वे स्थानकावर  आम्ही पोहचलो.  मोदी किंवा योगी इफेक्ट म्हणा नवीन व जगभरातील प्रवास्यांचे आदरातिथ्थ करण्यासाठि सुशोभित अशी नवीन रेल्वे स्थानकाची देखणी वास्तू उभारण्यात आली आहे.

पहाटेच्यावेळी तिच्यावरील आकर्षक अशी रंगबिरंगी विदयुत रोषनाईमुळे तिचे सौंदर्य अधिक उजळून दिसते. तेथुन एका लाॅजमध्ये मुक्काम हलवला. सकाळी फ्रेश होऊन बाबा विश्वनाथच्या दर्शनासाठी पावले वळाली. लाॅज मंदिरापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर होती.

त्यामुळे मंदिराकडे कसे जायचे याबाबत एकाला विचारले. त्यांनी घाटाने जायचा सोपा मार्ग सांगितला. जवळच्या हिमालय घाटापासून आम्ही  मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली. डोळयासमोर गंगेचे अथांग पात्र. नदी काठावर धुक्याची दुलई.  गंगेचे भव्य पात्र डोळयात साठवितांना तिच्या बद्दल लहानपणापासून ऐकलेल्या अख्याएिका, महात्म्य याची झलक पहायला मिळते.

साधारण एक किलोमीटर रुंदीचे गंगेचे पात्र या ठिकाणी आहे. त्यात असंख्य लहान मोठया बोटि भाविकांची ने आण करत असतात. घाटा घाटाने गंगेचे पात्र पहात आम्ही मंदिराकडे जात होतो. सूर्योदय घाट, नारद घाट, राजा घाट, महाराणा घाट मागे टाकत आम्ही पुढे सरकत होतो. राजा घाट आपल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेला. येथे प्रत्येक घाटांचे एक वेगळेपण हे. पुढे जातांना राजा हरिश्चंद्र घाट लागला. जो स्वप्नात दिलेला शब्द देखील पाळायचा असा हा राजा. या घाटावर अंतिमविधी केला जातो.

पुढे गेल्यावर सर्वात प्राचीन असा दश्वामेध घाट लागला. थोड चालत गेल्यानंतर ज्यासाठी वाराणसीत आलो ते बाबा विश्वनाथ मंदिर तेथून हाकेच्या अंतरावर होते. घाटावरुन जात असतांना तेथील स्वछता व वातावरणातील प्रसन्नपणा मनाला भावतो.

राजेंद्रप्रसाद घाटाच्या पायर्‍या चढून गेल्यावर मंदिराच्या दिशेच्या  रस्त्याकडे वळाले. मंदिराकडे जाण्याचे चार मार्ग. पहिल्या दरवाज्याने आम्ही मंदिराकडे निघालो. जो अनुभव आपल्याला इथे येतो तो तिथेही आला.

दोनशे रुपये दया. थेट दर्शन होईल.  पण रांगेतून जाण्याची बात वेगळी. त्यामुळे रांगेतूनच निघालो. मंदिराच्या प्रवेश द्वाराकडे जाण्यासाठी अतिशय चिंचोळया गल्लिचा मार्ग. दोन व्यक्ति जाऊ शकतील ऐवढि चिंचोळि गल्ली. दोन्ही बाजूला प्रसाद, फुले, पूजा साहित्य, बनारसी साडयांचे दुकाने. थोडया थोडया अंतरावर युपी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त. अंतिम टप्प्यात तर गणधारी कमांडो.

अंगावरचे कपडे व फुल आणि प्रसाद सोडला तर एकही वस्तू सोबत बाळगता येत नाही.  मुंगीवानी रांग सरकत होती. विदेशी भाविकांच्या  मुखातून ओम नम: शिवाय हा उच्चार लक्ष वेधून घेत होती. बाबा  विश्वनाथचे दर्शन घेण्यासाठि इच्छुकता वाढत होती.

थोड पुढे गेल्यावर मंदिर ऐवजी मशिदीचा घुमट दिसला. अगदी मंदिराला लागूनच. पुर्वी या ठिकाणी काशी विश्वनाथचे मंदिर होते. मोगलाच्या काळात मंदिर उध्दवस्त करुन या ठिकाणी मशीद बांधण्यात आली असे येथील स्थानिक लोकांकडून समजले.

पुढे अहिल्याबाई होळकर यांनी या ठिकाणी बाबा विश्वनाथचे नविन मंदिर उभारले असे सांगण्यात येते. थोड पुढे गेल्यावर ज्यासाठि भाविक हजारो किलोमीटरचा प्रवास करुन येतात ते बाबा विश्वनाथचे मंदिर डोळयासमोर दिसते. पाच बाय पाच इतक्या छोटया क्षेत्रात मुख्य मंदिराचा गाभा आहे.

गाभार्‍याला चार दरवाजे. गाभार्‍याच्या मध्यभागी छोटेसे शिवलिंग आहे. आत दिवसभर पूजापाठ व धार्मिव उपक्रम सुरु असतात. प्रचंड गर्दिमुळे एक मिनिटापेक्षा कमी वेळेत मुख्य गाभार्‍यात शिवलिंगाचे दर्शन घेउन बाहेर पडावे लागते.

मुख्य मंदिराच्या आजूबाजुला असंख्य छोटि मंदिरे आहेत. तेथून चौथ्या गेटने बाहेर पडावे लागते. तेथून मंदिराशेजारील पूर्ण मशीद दिसते. कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून कमांडोंचा कडक पहारा याठिकाणी चौवीस तास असतो.

काशीचे आदरातिथ्य भावते

मुंबई, पुणे अथवा इतर शहराप्रमाणे वाराणसीच्या रोजच्या जीवनात तुम्हाला जीवघेणी स्पर्धा दिसणार नाही. रोज हजारोंच्या संख्येने देशी विदेशी भाविक या ठिकाणी येतात. बनारसचे पान जसे खाल्यावर रंगत जाते तसे येथे भेट देणारे पर्यटक या शहराच्या रंगात एक होउन जातात. रस्त्याच्या दुतर्फ़ा पुरी भाजी, कोळशाच्या शेगडीवर वाफळणारा चहा, समोसे, आलू भाजी व गरमागरम जिलेबीचे ठेले आणि त्याचा घमघमाट तुम्हाला तिथ पर्यंत खेचत नेतो.

भूक असो की नसो तुम्हि जिभेचे चोचले पुरविल्याशिवाय राहत नाही. येथील रस्त्यावरील वाहतुकीला व माणसांना अजिबात शिस्त नाही. पन हे अनुभवण्याची मजापण काही औरच आहे. काशीचे कोतवाल ज्यांना म्हटले जाते ते काल भैरवांच्या दर्शनासठी आम्ही पुढे निघालो.

विश्वनाथ मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर कालभैरव मंदिर. पण वाराणसीच्या गल्ली बोळातून मार्ग काढणे म्हणजे महाअवघड दिव्य.  वाराणसीच्या गल्लीबोळ म्हणजे भुलंभुलैय्या.  एक गल्ली अर्धा ते एक किलोमीटर.

हरवला तर दिवसभर गल्लीबोळात फिरत बसेल इतकी गुंतागुत. पण अशा ठिकाणी गुगल मॅप दिशादर्शक म्हणून कामास येते.  या गल्लीबोळा या पुरातन  शहराच वैशिष्ट आहे.

दोन दुचाकी ये जा करू शकतील इतक्या अरुंद. दोन्ही बाजूला जुने वाडे. गल्लीमध्ये मिठाईची दुकाने. पेठा, रसगुल्ला, मलई बर्फी, गुलाबजाम, कुल्लडमध्ये दही एकाहून एक मिठाईचे नाना प्रकार.

मधेच पानाचे ठेले. याच गल्लींमध्ये छोटे छोटे भाजीपाल्याची दुकाने आहेत. एक विक्रेता गल्लीच्या वटयावर भाजी पाला विकत होता. तेथे जुना काळातील एक रेडीओ टांगुन ठेवला होता.

मस्तपैकी भोजपुरी गाणे सुरु होते व विक्रेता बिडिचा झुरका मारत त्या गाण्यावर गुणगुणत  होता.  अस सुध्दा मस्तपैकी जगता येत हे त्या माणसाकडे पाहून कळाले.

या गल्लींमध्ये कुत्रेपण आजूबाजूला बसलेले दिसतात. पण ते भुकतांना मला दिसले नाही. (ते मुके असावे असा अर्थ कोणी घेऊ नका). हा पण माकड अतिशय उपद्रवी. त्यांनी आम्हाला  कोणताही त्रास दिला नाही. त्यामुळे ते सुध्दा चांगले होते असा  निष्कर्ष मी काढला.

या गल्ली बोळातून फिरताना पाच कसे वाजले ते समजलेच नाही. येथे कडाक्याची सर्दी असून सुर्य लवकर मावळतो.  पाच वाजताच थंडी जाणवायला लागली. या गल्ल्यांमध्ये शेकोटी पेटायल्या लागल्या.  गल्ली बोळांचा पाहुणचार घेतांना जेवण बाकी राहिले होते. सायंकाळी गंगा आरतीची उत्सुकता होती.

दिवसभराच्या भटकंतीनंतर पावले पुन्हा काशी विश्वेश्वर मंदिर व गंगाघाटाकडे वळाली. पुन्हा थोडफार काहीतरी खाऊन घेत आम्ही  आरतीसाठी घाटावर पोहचलो.

आमच्यआधी ही आरती याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विदेशी भाविकांची गर्दी जादा होती. हजारो किलोमीटरचा प्रवास करुन हे पर्यटक हा सोहळा पाहण्यासाठि का येथे आले हे तेच सांगू शकतात.

गंगानदिच्या पात्रातील बोटित गर्दी जाली होती. या बोटितून गंगआरती पाहणे हा अद्बभुत क्षण ठरतो. एक तास ही आरती चालते. भाविक कॅमेर्‍यात हे क्षण कैद करतात. मानवी संस्कृती अनेक नदयाच्या काठि फुलली, बहरली. पण जिची आरती केली जाते ती गंगा एकमेव असावी. आरतीच्या सोहळयानंतर आमची पावले पुन्हा घाट मार्गाने लाॅजकडे वळाली.

गंगा घाट

वाराणसी आणी गंगाघाट हे वेगळे समीकरण आहे.  पुर्वीपेक्षा या घाटांवर अधिक स्वच्छता बघायला मिळते. येथील प्रत्येक घाटांचे एक वेगळेपण व वैशिष्ट आहे. येथे नारद घाट आहे. येथे आंघोळ केल्यावर आपसात भांडण लागते असे म्हणतात.

नारदमुनींनी येथे तपश्चर्या केली होती. नारदांना कळ लावणारे बोलले जाते. त्यामुळे येथे कोणी स्नान करण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. येथील घाट व अधात्म्य ऐवढाच सबंध नाही. य़ेथील काही घाट व तेथील हवेल्या राजेमहाराजांनी बांधल्या आहेत. आज या ठिकाणी त्याचे अलिशान हाॅटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.

विदेशी पर्यटकाचा येथे मुक्काम असतो. या हवेलींच्या खिडक्यातून समोेरील संथ वाहणारी गंगा डोळयात समावून घेण्याचा अनुभव काही औरच असावा. या घाटांवर कोणी स्कॅनवासवर चित्र रेखाटत असतो. कोणी नागा साधू भस्म चर्चुन समाधीवस्थेत मग्न असतो.  एक दोनजण तेथे पतंगीला ढिल देतांना पहायला मिळाले.

काहिजण फुटबाॅल खेळत होते. आश्चर्य म्हणजे तेथेच जवळ असलेल्या हरिश्चंद्र घाटावर अंतिम संस्कार केले जात होते. कदाचित ऐवढे वैविध्यपणा जगात कोठे पाहिला मिळू शकणार नाही. दिवसभर जो गंगाघाट व मंदिर परिसर गजबजलेला असतो तो रात्री निर्मनुष्य होत जातो.

कदाचित सर्व निद्रिस्त होत असतील. पण गंगा वाहत असते. महादेव जागेच राहतात. पुन्हा पहाटे मंदिरांमध्ये घंटानाद होतो. गंगेच्या साक्षीने बाबा विश्वनाथची महापुजेला प्रारंभ होतो. आम्ही सुध्दा सकाळी पुन्हा दर्शनासाठी मंदिराकडे निघालो.

नव वर्ष असल्याने मंदिराबाहेर दोन ते तीन किलोमीटर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. आम्ही दर्शनाचा मोह टाळून प्रसिध्द मणिकर्णीका घाटाकडे निघालो.

वाराणसीत दोनच घाटांवर अंतिम संस्कार केले जातात. एक हरिश्चंद्र व दुसरा मणिकर्णिक. मणिकर्णिका घाटावर चौवीसतास प्रेत दहन केली जातात. ऐरवी आपण मशानात जाणे टाळतो. पण मणिकर्णिका घाटावर चिता जळत असताना आपण मनात कोणताही किंतू परंतू न बाळगता घाटावरील मशानात अगदी  सहजतेने वावरतो.

जीवनाच अंतिम सत्य सम्शान हे हेच अंतिम सत्य हे. नव वर्षात दर्शन करायले हवे. म्हणून पास घेउन मंदिरात गेलो. दुपारची महाभोग आरती घेऊन बाहेर पडलो.  तीनची ट्रेन होती. पॅकअप करुन वाराणसीला अलविदा करण्यासाठि बाहेर पडलो. या प्रवासाच्या आठवणी शब्दबध्द करताना मन अजुनही मी गंगा घाटावरच असल्याचे वाटत आहे.

वाराणसी, बाबा विश्वनाथ आणी गंगाघाट हे तीन शब्द. माहित नाही पण प्राचीन काळापासून ते अगदी टेक्नोसेव्ही युगातही या तीन शब्दाबद्दलचे वलय, कुतूहल, आकर्षण, उत्सुकता तुसभरही कमी झाली नाही. ती कमी होणारही नाही. होऊ शकत नाही.

बाबा विश्वनाथची नगरी पहिल्याच भेटित प्रत्येकाला आपलसं करते. अगदी इतक की अलविदा करताना पाय जड पडतो. या शहराबद्दल बोलण्यासारख खूप काहि हे. खूप सांगण्यासारख आहे.

एक नक्की सांगेल या शहराने त्याचा हा लहेजा असाच जपला पाहिजे. अगदी बनारसी पानासारखा.  या शहरात फेरफटका मारत असताना लोकांच्या चर्चांमध्ये कोठेही मंदी व आता काय होइल या गप्पा दिसल्या नाहीत.

मंदीचा साधा लवलेशही नव्हता. बाकिचे विषय तर दुरच. गल्ली बोळात पानाचा आस्वाद घेत, शेकोटिची उब घेत गप्पांचा फड रंगत जातो. इथल्या गल्ली बोळांचे रुपडे पालटावण्यासाठी अगदी लंडनवरुन आर्किटेक्ट आणले तरी ते हाथ जोडतील अशी रचना. पण ही भुलंभुलैय्या अशीच रहावी.

वाराणसीच्या या गल्ली बोळात फिरताना जीवनाच्या नाना रंग, छटा,पैलूंचे दर्शन झाल्याशिवाय रहात नाहि. ऐवढे निवांत आयुष्य जगता येते हे बाबा विश्वनाथची नगरी शिकवते. आपण का ऐवढे आनंदी, निश्चित व प्रत्येक गोष्टिचा आनंद उपभोगत जगू शकत नाहि हा प्रश्न मनाला सतावतो.

या लोकांशी बोलतांना एक विश्वास दिसतो. बाबा विश्वनाथ हे ना. सब देख लेंगे. सोप्या शब्दात सांगायचे तर बाकि सब झुठ है. अंतिम सत्य व शाश्वत कोण असेल तर ते बाबा विश्वनाथ है… बाबा विश्वनाथ है!

गंगेबद्दल बोलायचे तर ती जीवन सरिता हे. गंगा ही तिच्या नावाप्रमाणे निर्मळ हे. गंगा पवित्र हे. ती अशीच सतत प्रवाही रहावी. खळखळत रहावी. गंगा जी मी पाहिली, तुम्ही पाहिली ती पुढच्या पीढिला पहायला मिळेल का ? हा प्रश्न मनाला सतावतो. तरीपण बाबा विश्वनाथ हे. भोलेबाबा सब अच्छा करेंगे असे म्हणायचे.

दिड दिवसात काशी फिरुन होत नाही. संकटमोचन हनुमान मंदिर, बनारस विश्व हिंदू महाविदयालय अशा अनेक स्थळांना वेळेअभावी भेटी देणे राहुन गेले. कदाचित राहून गेलेले स्थळ पाहण्यासाठी वाराणसीने पुढील भेटीचे दिलेले हे निमंत्रण  असावे.  दीड दिवसांचा हा प्रवास शब्दबद्ध केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या