अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बसस्थानकावर बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणार्या महिलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्या चौकशीत अहिल्यानगर जिल्ह्यातील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी तिच्याकडून 6 लाख 11 हजार रूपये किमतीचे 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या टोळीतील अन्य चार महिला पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
24 जुलै रोजी अहिल्यानगर शहरातील पुणे बसस्थानकावर एक महिला बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी तिच्या पर्समधील 3 लाख 60 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार निळकंठ कारखेले, विकास साळवे, भगवान सानप, बाळासाहेब खेडकर, सतीष भवर, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, किरण ठुबे यांचे विशेष पथक तयार केले होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
शनिवारी (14 नोव्हेंबर) तपास पथकाला संबंधित चोरी शिल्पा प्रशांत चव्हाण (वय 22, रा. निपाणी वडगाव, ता. पाथर्डी) हिने साथीदार महिलांसह केल्याची माहिती मिळाली. ती सध्या माळीवाडा बसस्थानक परिसरात थांबलेली असल्याचेही समजले. त्यानुसार पथकाने तातडीने माळीवाडा बसस्थानक परिसरात जाऊन शोध घेतला आणि शिल्पा चव्हाण हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने साथीदार महिलांसह हा गुन्हा केल्याची माहिती दिली.
या टोळीत दीपाली ऊर्फ गुटी निखिल चव्हाण (रा. शेवगाव रोड, पाथर्डी), कारली पाल्या चव्हाण (रा. कोरडगाव, ता. पाथर्डी), कोमल नागनाथ काळे (रा. पाथर्डी रोड, शेवगाव) आणि यासमिन ठाकूर भोसले (रा. भानसहिवरा, ता. नेवासा) यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. या चारही महिला सध्या पसार आहेत. अटकेतील महिलेकडे अधिक सखोल चौकशी केली असता, अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यातील एक आणि पाथर्डी पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण तीन गुन्ह्यांचा समावेश आहे.




