मानूर |वार्ताहर| Manur
कळवण आदिवासी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित घर ठरण्याऐवजी आता मृत्यूचे कारागृह ठरत असल्याचे चनकापूर शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या थरकाप उडवणार्या घटनेतून सिद्ध झाले आहे. तिसरी इयत्तेत शिकणारा निष्पाप विद्यार्थी रोहित विलास बागुल याचा मृत्यू झाला आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, रोहितचा मृतदेह सकाळपासून मुख्याध्यापकांच्या टेबलावर तासन्तास पडून राहिला आणि जबाबदार अधिकारी मात्र गायब होते!.
रोहितची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून बिघडत होती. काल सकाळपासून अचानक त्याची तब्येत गंभीर झाली. शाळेतील अधीक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे नेमकी जबाबदारी असतांना योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाली नाही. अधीक्षक संजय नांदणे रजा टाकून गायब होते, तर मुख्याध्यापक बालाजी भुजबळ मुख्यालयी उपस्थित नव्हते. विद्यार्थ्याच्या जीवाशी असा उघडपणे खेळ झाला.
सकाळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर रोहितचा मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवण्यात आला. तासन्तास त्या टेबलावर लटकत राहिलेला मृतदेह पाहून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. शिक्षणाच्या मंदिरात असा अमानवीय प्रसंग घडावा? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा व प्रकल्प अधिकारी अंकुनुरी नरेश तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत मुख्याध्यापक बालाजी भुजबळ आणि अधीक्षक संजय नांदणे यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले.
तसेच रोहितच्या मृत्यूने पालकवर्ग संतापला आहे. शेकडो पालकांनी शाळेसमोर जमून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आमच्या लेकरांचा जीव एवढा स्वस्त आहे का? शासन लाखो रुपये खर्च करते, पण अधिकारी आमच्या लेकरांना जिवंत ठेवू शकत नाहीत.दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू! पालकांच्या डोळ्यांत अश्रू आणि संतापाचा ज्वालामुखी एकत्र दिसून येत होता.




