Friday, May 3, 2024
Homeनगरशेतमालकाकडून आदिवासी महिलांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

शेतमालकाकडून आदिवासी महिलांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

राहाता |वार्ताहर| Rahata

शेतात कांदे लावण्याच्या कामाचे पैसे मागितल्याने शेतमालकाने आदिवासी समाजाच्या मजूर महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना राहाता शहरात घडली. या प्रकरणी राहाता पोलिसांत शेतमालक पती-पत्नी विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

शेतमजूर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शेत मालक प्रशांत गायकवाड यांच्या शेतात एक महिन्यापूर्वी कांदा लावण्याचे काम केले होते. एक महिना पेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्याने या शेतमजूर महिलांना पैशाची अडचण होती. अडचण असून देखील शेतमालक प्रशांत गायकवाड पैसे देत नसल्याने संबंधित शेतमजूर महिला त्यांच्या घरी जाऊन गायकवाड यांच्याकडे मजूर महिलांनी आपल्या कामाचे पैसे मागितले.त्यावेळी शेतमालक प्रशांत गायकवाड व त्यांची पत्नी अनिता गायकवाड यांनी शेतमजूर महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली.

फिर्यादी मुलीच्या आईने आरोपी प्रशांत गायकवाड यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. तेथे जवळच पडलेली कुर्‍हाड उचलून तुमचे एकेकाचे मुद्दे पाडतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी महिला व तिच्यासोबत असलेल्या महिला घाबरल्याने त्यांनी तिथून पळ काढला.

त्यानंतर राहता पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी प्रशांत गायकवाड व त्यांची पत्नी अनिता गायकवाड दोघेही राहणार पिंपळवाडी रोड राहाता यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या