भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
मागील दोन वर्ष करोनामुळे आदिवासींचा पारंपारिक सण असलेला बोहडा उत्सव साजरा करता आला नाही. मात्र या वर्षी शनिवार व रविवारी पांजरे गावात बोहडा उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.
अनेक वर्षांपासून आदिवासी भागात बोहडा प्रथा चालत आली असून या उत्सवास यात्रेचे स्वरूप येते.गावातील व बाहेरगावी असलेली सर्व मंडळी गावाकडे येतात.
आदिवासींना पूर्वी कुठलीही करमणुकीची साधने नव्हती. त्यामुळे वर्षातून एकदाच उन्हाळ्यात उत्सव साजरा केला जातो. पांजरे आणि लव्हाळवाडी या गावांमध्ये कार्यक्रम पार पडले. आदिवासी पट्ट्यात चिचोंडी, मुतखेल, घाटघर, उडदावणे, पांजरे, शिंगणवाडी या गावांमध्ये दरवर्षी हा बोहड्याचा कार्यक्रम होतो.
सर्व गावकरी अतिशय उत्साहात याप्रसंगी एकत्र येतात. महाभारत, रामायण आणि शिवपुराण यातील सोंग घेवून मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला जातो. वर्षभर काबाडकष्ट करणार्या आदिवासींच्या दृष्टीने हा एक मोठा उत्सव असतो. आणि त्यामुळे घरोघरी पाहुणे मंडळी येतात. गोड धोड जेवण होते. गावात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला जातो. बोहड्यासाठी नगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील रसिक पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.