Monday, November 25, 2024
Homeब्लॉगआदरांजली : विचारनिष्ठ, पक्षनिष्ठ जवाहरलालजी

आदरांजली : विचारनिष्ठ, पक्षनिष्ठ जवाहरलालजी

आज राजकारणातील आरोप-प्रत्यारोप आणि घसरलेली पातळी पाहिली की, जवाहरलालजी यांच्या विचारांची प्रकर्षाने जाणीव होते. भांडवलशाही, समाजवाद आणि साम्यवादाचा विचार करता काँग्रेसची विचारधारा समाजवादाजवळ जाणारी राहिली. जवाहरलालजी त्याचे पाईक होते. त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने आदरांजलीपर दोन शब्द!

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा हे माझ्यासोबत दीर्घकाळ विधिमंडळात होते. राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. माझे आणि जवाहरलालजींचे कौटुंबिक ऋणानुबंध राहिले आहेत. विजयजी आणि राजेंद्रजी या त्यांच्या दोन्ही मुलांसमवेतही माझा संवाद, संपर्क नेहमी राहिला आहे. विजयबाबू आणि मी संसदेत एकत्र काम केले आहे. राजेंद्रजींनी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून उत्तम कामगिरी बजावली. अशा कर्तृत्वसंपन्न कुटुंबाचे जवाहरलालजी आधारवड होत.

- Advertisement -

जवाहरलालजी काँग्रेस पक्षाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ होते. इंदिराजींसमवेत त्यांनी काम केले आहे. एकेकाळी इंदिराजींच्या विश्वासातील अनेक जण काँग्रेसपासून दूर गेले. परंतु, जवाहरलालजींनी आपली पक्षनिष्ठा कायम जपली. मी त्यांच्या यवतमाळमधील घरीही गेलो आहे. राजकारणात टीका, आरोप होतात. मला आवर्जून जवाहरलालजींचे वैशिष्ट्य सांगितले पाहिजे. त्यांच्यावर कोणीही टीका केली तरी त्यांनी भाषेची मर्यादा कधीच ओलांडली नाही. ते मृदूभाषिक होते. आपले म्हणणे नेमकेपणाने मांडत, परंतु भाषा संयत असे. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक असतात. कोणी आपला विरोधक आहे म्हणजे शत्रू नाही, ही त्यांची धारणा होती.

विरोधक हा आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आहे. त्याच्या नीती-धोरणावर टीका केली पाहिजे. व्यक्तिगत आरोप टाळले पाहिजेत, या मतांचे जवाहरलालजी होते. आज राजकारणातील आरोप-प्रत्यारोप अन् घसरलेली पातळी पाहिली की, दर्डाजींच्या विचारांची प्रकर्षाने जाणिव होते.

भांडवलशाही, समाजवाद आणि साम्यवादाचा विचार करता काँग्रेसची विचारधारा समाजवादाजवळ जाणारी राहिली. जवाहरलालजी त्याचे पाईक होते. टोकाची भांडवलशाही आली तर श्रीमंत आणि गरिबीतील अंतर वाढत जाईल. टोकाच्या साम्यवादातून हित साधले जाणार नाही. मध्यम मार्ग म्हणून समाजवादाच्या दिशेने गेले पाहिजे, अशी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते.

विशेषत्वाने राजकीय समतेइतकेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समाज उन्नत झाला पाहिजे, यासाठी आग्रही राहिले पाहिजे, हा विचार काँग्रेसमधील धुरिणांचा होता. त्याच विचारांवर जवाहरलालजी यांची राजकीय वाटचाल राहिली.

जवाहरलालजी यांचा जन्मशताब्दी सोहळा, त्यानिमित्ताने देशभर होणारे उपक्रम त्यांच्या विचारांना सुसंगत आहेत. लोकमतसारख्या अग्रगण्य वृत्तपत्राची स्थापना, उभारणी त्यांनी केली. ते राजकारणात होते. काँग्रेसचे नेते होते, म्हणून त्यांनी आपल्या दैनिकातून विरोधकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले, असे आम्ही कधीही पाहिले नाही. त्यांनी उदात्त दृष्टीकोन अंगिकारला होता. विरोधी पक्षाचा सन्मान करणाऱ्या जाणत्या नेत्यांपैकी जवाहरलालजी महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते होते. हाच विचार घेऊन, सर्वांना सोबत घेऊन गावाचा, प्रांताचा, देशाचा विकास साधू शकतो.

व्यक्तिगत द्वेष, टोकाची भूमिका घेऊन पुढे जाता येणार नाही. पक्षनिष्ठेबरोबरच जवाहरलालजींनी स्वतःच्या जीवनात राष्ट्रीय विचार, सामाजिक सौहार्द, प्रत्येकाबद्दल प्रेमभाव, आपुलकी आणि संवेदनशीलता जपली. त्यामुळेच ते सर्वांना जवळचे वाटतात. अशाच वैचारिक बांधिलकीतून लोकमत वृत्तपत्र समूह त्यांनी उभारला आणि वाढवला. देशपातळीवर, राज्यपातळीवर होणाऱ्या त्यांच्या दैनिकाच्या बहुतांश सन्मान सोहळ्यात मी आवर्जून उपस्थित राहिलो आहे. जवाहरलालजींना अपेक्षित समाज, देश घडवण्यात त्यांचे दैनिक सदैव पुढे आहे आणि राहील, हीच जवाहरलालजींसाठी कृतिशील आदरांजली!

– शिवराज पाटील-चाकूरकर,माजी केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या