Thursday, March 13, 2025
Homeनाशिकज्ञानवंत, प्रज्ञावंत आधारस्तंभ हरपला

ज्ञानवंत, प्रज्ञावंत आधारस्तंभ हरपला

वै. देवकिसनजी सारडा यांच्या शोकसभेत विविध संस्थांच्या वतीने श्रद्धांजली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्व. देवकिसनजी सारडा उर्फ मोठे भाऊ यांनी नाशिकच्या उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, माध्यम, सामाजिक यांसह विविध क्षेत्रांत भरीव योगदानाबद्दल भावना व्यक्त करताना आठवणींची कुपी उघडत गतस्मृतींचा सूगंध शोकसभेत दरवळला. मोठ्या भाऊंच्या जाण्याने एक बहुआयामी,द्रष्टा, अभ्यासू आणि सुुहृदयी उद्योजक गमावल्याची भावना विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी शोक सभेत व्यक्त करुन त्यांना आदरांंजली वाहिली.

- Advertisement -

नाशिकमधील उद्योजक देवकिसनजी सारडा यांचे शुक्रवारी (दि.20) रोजी देहावसान झाले. त्यांना विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि.29) करण्यात आले होते. यावेळी विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी नाशिकमधील अनेक संस्थांवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या देवकिसनजी सारडा यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श नवीन पिढीने आदर्श घ्यावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले. यावेळी बोलताना मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मोठे भाऊंचे बहुआयामी व्यक्तीमत्व, चळवळीतले नेते, चळवळींचे जनक, तत्वमुल्य जपणारा आधारवड हरपल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी नाशिक एज्युकेशन सोसायटी, मविप्र सारख्या शैक्षणिक संस्था, सावाना, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आदी साहित्यिक संस्था, वसंत व्याख्यानमाला, महाराष्ट्र चेंबर्स, निमा, आयमासह विविध औद्योगिक संघटना बँकिंग, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, प्रसार माध्यमे, नाशिक बार असोशिएशन, सामाजिक संस्था आदींतर्फे देवकिसनजी सारडा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोणत्याही शहराचे वैभव हे त्या शहरातील इमारती व भौतिक सुविधा वरुन नव्हे तर त्या शहरातील कर्तृत्ववान व्यक्तीवरुन ठरत असते. नाशिकला देवकिसन सारडा यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीमुळे ओळख निर्माण झाली. अशा ऋषीतुल्य व्यक्ती जेव्हा काळाच्या पडद्याआड जातात तेव्हा शहराचे अतोनात नुकसान होते. आज मोठ्या भाऊंंच्या निधनाचे ही पोकळी प्रकर्षाने जाणवत आहे.
दिलीप फडके, अध्यक्ष सावाना नाशिक

स्वर्गवासी मोठे भाऊ हे लहान लहान सोबत लहान राहत होते. मोठ्यांसोबत मोठ्या सारखे वागत. लहान मुलांच्या प्रत्येक गोष्टींची नोंदही ते ठेवत होते. त्यांचे कौतुक करत होते. त्यांच्याशी संबंध ठेवत होते. संवाद साधत होते. मोठ्या भाऊंचा अभ्यास दांडगा होता. अध्यात्म, ज्ञानेश्वरी, शेरोशायरी, वाङ्मय, कला, उद्योग, व्यवसाय, व्यापार, राजकारण चळवळ अशा विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण केला होता. प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क ठेवणे हा त्यांचा आवडीचा स्वभाव होता.
-जितूभाई ठक्कर -कॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया

कमी वयाचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष झालेले एक चतु:रस्र व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीमान देवकिसनजी सारडा होते. शंंतनुराव किर्लोस्कर, लालचंद हिराचंंद आपटे यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. स्टेट बंँकेच्या अध्यक्षांना परीषदेसाठी पाचारण क रुन त्यांना लघु उद्येाजकांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा करुन दिला होता. विडी व्यवसायाला उद्योगाचा दर्जा त्यांच्यामुळे मिळाला होता. आता किड्यांचेही कुटुंंब नियोजन असा जळजळीत अग्रलेख लिहून त्यांंनी अन्नभेसळी विरुध्द केलेला हास्यास्पद कायदा मागे घेण्यास भाग पाडले होते. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष असे पाहिले की, त्यांंनी मंंत्र्यांनाही संभा संंपली असे सांगून सभा गुंडाळली होती.
-दिलीप साळवेकर

मोठ्या भाऊंची कल्पकता व निर्णयक्षमता दांडगी होती. कोणत्याही प्रश्नासाठी त्यांच्याकडे तात्काळ उपाययोजना होत्या. संस्था जसजसे मोठ्या झाल्या, त्या-त्या वेळी काही ना काही कठीण प्रसंग येत गेले. त्यांना तोंड देऊन पुढे मार्गक्रम कसे करायचे, हे मोठे भाऊंकडून आम्ही शिकलो. निमासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून पुढे जाण्याचे धाडस दिले.
-डी. जी. जोशी, माजी अध्यक्ष निमा

मोठे भाऊंनी माणसे खूप जपली. हीच माणसे त्यांचा बँक बॅलन्स होता. मी एमसीएची अध्यक्षा भाऊंच्या मार्गदर्शनाने झाली. त्यानंतर प्रत्येकवेळी त्यांच्या मार्गदर्शनातून वाटचाल केली. त्यामुळे कुठेही अडचणी आल्या नाहीत. त्यांची कल्पकता वाखाणण्याजोगी होती. नाशिक महापालिका हद्दीत तत्कालिन ऑक्ट्रॉय(कर) रद्दबातल करण्यात भाऊंची मोठी भूमिका होती. भाऊंचे वाचन आणि निरीक्षण तल्लख होते.
-मीनल मोहाडीकर, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

मोठे भाऊ व माझ्या दोन जनरेशनचा गॅप आहे, मात्र पारिवारिक संबंध खूप जवळचे आहे. नाशिकला औद्योगिक नगरी आणण्यात दोन बाबू शेठ यांचा वाटा आहे. एक म्हणजे बाबुशेठ सारडा अर्थात मोठे भाऊ तर दुसरे म्हणजे बाबूशेठ राठी. मोठे भाऊंमध्ये काम करून घेण्याची विशेष कला होती. त्यांच्या सल्ल्यानुसार सदैव काम केले. अध्यक्षांना जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, त्या-त्या वेळी मोठे भाऊंकडे जाऊन मार्गदर्शन घेऊन मार्ग काढले आहे. त्यांनी नाशिकमधील सुमारे सात हजार उद्योगांची पायभरणी केली.
-मनीष कोठारी, नाशिक इंजिनिअरींग क्लस्टर

नाशिक शहरासह जिल्ह्यातील जडणघडणीमध्ये मोठे भाऊंचा मोठे काम आहे. संस्थांचा ते भांडार होते. संस्था घडवणारे मोठे भाऊ यांचा आशीर्वाद घेण्यासाठी 2011 साली निमाचा अध्यक्ष झाल्यावर गेलो, तेव्हा त्यांनी निमा ही तरुण झाल्याचे मला सांगितले होते. ते नेहमी आम्हाला मार्गदर्शन करायचे. त्यांनी औद्योगिक नगरीला मोठे योगदान दिले आहे. औद्योगिक नगरीला 54 वर्षांची परंपरा असून पन्नास वर्षांपूर्वी निमाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या सूत्रानुसार निमाचे काम सुरू असून त्यांच्या तत्वानुसार सध्या निमा चालत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
-धनंजय बेळे, निमा

सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मोठे भाऊ होते.पत्रकारिता क्षेत्रात काम करताना समाजाला दिशा देण्याचे कामही देवकिसनजी सारडा यांनी केले. सामाजिक चळवळीसोबतच उद्योजकता विकासाला गती दिली. नवीन पिढीला त्यांंचे काम सदैव प्रेरणादायी राहील. त्यांंच्या कार्यातून राजकीय, सामासिजक, शैक्षणिक क्षेत्रातील तरुणांनी प्रेरणा घेऊन कार्यरत राहणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
खा. भास्कर भगरे

एका जीवनात एक माणूस किती काम करू शकतो त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे मोठे भाऊ आहे. त्यांनी अनेक कुटुंबांना मदत केली, विविध संस्थांना उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून सिन्नरला विडी कामगारांच्या मुलांसाठी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने कॉलेज काढायचा विचार केला तेव्हा त्यांनी भरीव मदत करून कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठी जबाबदारी स्वीकारली होती. सामाजिक भान त्यांच्यात होता, ते फक्त नाशिक पुरते मर्यादित नव्हते तर त्यांचे कार्य राज्यभरात होता. त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्ग क्रम करणे म्हणजे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
अ‍ॅड. नितीन ठाकरे, मविप्र सरचिटणीस

आमच्या संंस्थेच्या आर्थिक अडचणीच्या काळात सर्वात मोठा हातभार भाऊंंचा लाभला होता. तेव्हापासून जो स्नेह निर्माण झाला तो अद्याप कायम आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचार्‍यांशी त्यांंचा कौटुंबिक जिव्हाळा होता. त्यांंच्या दातृत्वाचा एखादा गुण जरी घेता आला तरी ती त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
-शैलेेश पाटोळे, नाशिक एज्युकेशन सोसायटी

आमच्या संस्थेच्या विकासात भाऊंचा सिंहाचा वाटा होता. ब. ना. सारडा विद्यालयासाठी त्यांनी दिलेले योगदान अमुल्य होते. आमच्या संस्था व शिक्षक वृंदातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली.
-प्रल्हाद कुलकर्णी, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ

1976 साली कीर्ती कला मंदिरची स्थापना झाली. स्व. कमलाबाई सारडा अध्यक्षा होत्या. तर पहिल्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असताना मी सायकल घेऊन त्यांच्या घरी गेली. कमलाबाईंना सर्व माहिती देऊन सुमारे 25-30 पत्रिका वाटासाठी मी सायकलवर निघत असताना मागून त्यांनी आवाज दिला व तू सायकलवर नको जाऊ, असे सांगून मला गाडीत पाठवले. त्यांना मोठे भाऊंनी गाडीत पाठविण्याचे सांगितले होते. माझी खूप काळजी घेतली. मला गाडी देऊन माझी सायकल माझ्या घरी पोहोचवली. त्यांना माणूस ओळखायची कला होती. मोठे भाऊ फोनवर सतत माझ्या संपर्कात होते. माझ्या नृत्याबद्दल नियमित विचारणा केली. अत्यंत सरळ व सजगता कायम त्यांच्यामध्ये होती.
रेखाताई नाडगौडा, संस्थापक कीर्ती कला मंदिर

माहेश्वरी समाज प्रदेश अध्यक्षांचा संदेश
माहेश्वरी समाज सभेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांचे विचार हे सर्वांसाठी प्रेरक आहेत. ते इतके उत्तुंग होते की, त्यांना महेशभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. आपण सर्वांनी त्यांच्या विचारावर चालणे, हीच त्यांना श्रद्धांजली असेल.
-विनोद जाजू, प्रदेश कोषाध्यक्ष, माहेश्वरी समाज सभा

मोठे भाऊ म्हणजे देवकिसनजी सारडा हे माहेश्वरी समाजाजे आदर्श होते. पुढील पिढी कशी चांगली घडेल, यासाठी सतत प्रयत्नव्रत असत, हा त्यांचा गुण होता. जकात हटाव चळवळीत मी स्वत: त्यांच्यासोबत जवळून काम केले. माहेश्वरी समाजाचा आधारवड हरपला आहे. आम्ही पोरके झालो आहे.
-उमेश मुंदडा, माहेश्वरी समाज

लहानपणापासून सारडा परिवाराचा परिचय व्यासंग व्याख्यानमालेत उभे राहून वाड्.मय ऐकणे, संवाद ऐकणे आणि या माध्यमातून सांस्कृतिक जडणघडण घडली. नाशिकच्या जडणघडणीच्या परिवारांना मोठा सहभागीत योगदान दिले. त्यात सारडा परिवार हे अग्रस्थानावर होते आणि त्यातही मोठ्या भाऊंचे नाव हे अग्रस्थानी होते. मीडिया, शिक्षण, अर्थकारण, सांस्कृतिक जडणघडण अशा विविध अंगांनी काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांगीण थॉट प्रोसेस त्यांची दांडगी होती.
-डॉ. सुधीर संकलेचा, अध्यक्ष आयएमए

नाशिक सार्वजनिक वाचनालयाशी त्यांंचे अतुट नाते होते. त्यांनी कधीही कामकाजात हस्तक्षेप केला नाही. देशदूतच्या माध्यमातून त्यांंनी अनेकाना लिहिण्याची प्रेरणा दिली. त्यांंच्या प्रोत्साहनामुळे आज शहारातील अनेक संस्थांमध्ये अनेक जण चांंगल्या पदावरकार्यरत आहे. ते नाट्य रसीक होते. चांगल्याच्या पाठीवर शाबसकीची थाप देऊन त्यांंना कायम प्रोत्साहन दिले होते. माहेश्वरी समाजासाठी त्यांचे योगदान अमुल्य आहे.
-जयप्रकाश जातेगावकर, सावाना ग्रंथसचिव

आदरणीय कै. देवकिसन भाऊ हे आयुर्वेदाचे पुरस्करते होते. 1998 साठी महाराष्ट्र नव्हे तर भारतातील पहिला आयुर्वेद विशेषांक देशदूत ने काढला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. कोविड काळात सतत फोन करून आयुर्वेदाचा प्रसार करून प्रोत्साहन द्यायचे स्मृती तर खूपच छान होती, भावपूर्ण श्रद्धांजली.
-वैद्य विक्रांत जाधव

भाऊ हे एकूणच चळवळीचे जनक व बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्या काळात त्यांनी प्रतिष्ठित व काही राजकारण्यांची दहशत मोडून काढली. गुप्ते यांना निवडून आणले. नाशिकहून सुरु झालेल्या शेतकरी चळवळीत शरद जोशी यांच्या मागे भाऊ कणखरपणे उभे होते. त्यामुळे यशही मिळाले. जपून राजकारण कसे करायचे हे शिकवले.
-गुरुमितसिंग बग्गा, माजी उपमहापौर.

नॅब सुरू झाले तेव्हा कार्यालयासाठी दैनिक देशदूतमध्ये 1984 साली त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. एक टेबल एक खुर्चीवर सुरू झालेल्या नॅबचा महाराष्ट्रभर विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. नाशिकला राज्यपाल कोश्यारी आल्यावर मोठे भाऊंना आम्ही बोलावले होते. तेव्हा त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार झाला होता. मोठ भाऊंची संस्थेला ती शेवटची भेट ठरली. संस्थांना बळ देणारे व्यक्तिमत्व म्हणजे मोठे भाऊ
-रामेश्वर कलंत्री अध्यक्ष नॅब महाराष्ट्र

वसंत व्याख्यानमाला सुरुवातीला मोठी आर्थिक चणचण होती. लाऊड स्पीकर नसल्याचे मोठे भाऊंना सांगितल्यावर भाऊंनी त्वरित लाऊड स्पीकर उपलब्ध करुन दिले. नंतर मोठे भाऊ कार्याध्यक्ष झाले. त्यामुळे वसंत व्याख्यानमालेला दर्जेदार वक्ते उपलब्ध करून दिले. समाजातील वेगवेगळ्या लोकांना मोठे करून त्यांनी मदतीचा हात दिला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी लोकांना तयार करण्याचे काम केले. प्रबोधिनी शाळा, नॅब सारख्या दिव्यांगांसाठीच्या संस्था उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, वसंत व्याख्यानमाला

साहित्यिक गोतावळा या पुस्तकावेळी त्यांची ओळख वाढली. हे व्यक्तित्व खूप हुशार होते. एकच नाहीतर सर्वच क्षेत्रांत ठसा उमटविलेले हे लेखक, उद्योजक अतिशय माणसाळलेले व वक्तशिर होते. मी चांगल्या एका कादंबरीला देवकिसन सारडा यांचे नाव देईल, अशी माझी इच्छा आहे.
-विलास पोतदार, अध्यक्ष, प्रकाशक संघ, नाशिक

मोठे भाऊ हे पूर्वीपासूनच वाचन, लिखाणाच्या आवडीसह नवीन काही तरी करण्यात विशेष रुची दाखवित. आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केल होते. पुस्तकांप्रति त्यांचे खूप प्रेम होते. वाचनप्रेमींकडून आदरांजली
-मिलिंद चिंधडे, लेखक

स्वर्गीय देवकिसनजी सारडा यांच्या कृतिशील जीवनाची उंची नैतिकतेचे बळ देणारी तर रुंदी अनेक व्यक्तिमत्व घडवणारी अशी आहे. काही व्यक्ती पदामुळे मोठे होतात, मात्र त्यांच्यामुळे अनेक व्यक्ती मोठे झाल्याचे दिसून आले.
-यशवंत पाटील, यशवंत क्लासेस

भाऊ नेहमी अभिनंदनीय, कसदार, समजदार असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी समाजासाठी जीवन समर्पित केले आहे. आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांना समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विशेष ओळख आहे.
-गौतम सुराणा, नावा

भाऊ सिन्नरचे भुमीपुत्र होते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सिन्नरमधील प्रत्येकाशी त्यांंंचे घनिष्ट संंबंध ठेवले होते. सिन्नरमधील प्रत्येक घडामोडीची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे संग्रहीत होती. सिन्नर वाचनालय, व्यापारी बँक यांना सक्षम करण्यामध्ये त्यांंचा मोठा वाटा होता. विडी कामगार चळवळीतून त्यांनी उद्योजकतेचे धडे सर्वप्रथम समाजाला दिले. विद्यार्थी यांंच्यासाठी त्यांंनी केलेले कार्य कदापि विसरता येणार नाही.
-कृष्णाजी भगत , सिन्नर

सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यात श्रीमान सारडा यांच्यासारखे उद्योजक लाभले म्हणून आज एवढे वैभव दिसत आहे. ते नसते तर या तालुक्याचे काय झाले असते, असा प्रश्न कधीकधी पडतो. आज जी सर्व क्षेत्रात सिन्नरची प्रगती दिसते, त्यात देवकिसन सारडांंंचे योगदान मोठे आहे, असे उभारी देणारे व्यक्तिमत्व आता दुर्मिळ झाले आहे.
-अ‍ॅड. भगीरथ शिंदे , सिन्नर

नाईसच्या माध्यमातून भाऊंनी अतिशय सामान्य व्यावसायिकांनाही गाळे उपलब्ध करुन दिले. ज्योती स्टोअर्सच्या लेखक तुमच्या भेटीला उपक्रमास त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका केली. ते वाचनप्रेमी होते. अनेक पुस्तकांवर ते चर्चा करत असत. अनेक लेखकांना ते विषयही सूचवत होते. त्यांना वाचण्याचा मोठा व्यासंग होता. त्यामुळे नेहमी माझा त्यांच्याशी पुस्तकांसंदर्भात संपर्क येत होता. भाऊ अतिशय स्पष्ट वक्ते होते. माझ्यासाठी पितृतुल्य छत्र हरपले.
-वसंंतराव खैरनार, ज्योती स्टोअर्स, संचालक

अखिल भारतीय शेकोटी संमेलन मविप्रचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. 48 तास चालणार्‍या या जागतिक संमेलनास कृतज्ञता म्हणूण आम्ही देवकिसन सारडा साहित्यनगरी असे नामकरण करणार आहोत. त्याबाबत कुटुंबाकडे विनंती करणार आहे. विनम्र अभिवादन!
सुरेश पवार, गिरणा गौरव प्रतिष्ठान

लहान मोठ्या प्रत्येकाशी हसतमुखपणाने स्वागत करणारे दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे मोठे भाऊ त्यांचा वक्तशीरपणा हा कठोर होता. कामाच्या बाबतीत अतिशय ते परखडपणे वागत होते. लोकहितवादी मंडळाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. तात्यासाहेब शिरवळकर आणि भाऊ यांचा हातभार लागला होता म्हणूनच आज 75 वर्षे लोकहितवादी मंडळ टिकून असल्याची भावना आहे.
सुभाष पाटील, लोकहितवादी मंडळ

14 ऑक्टोबर 1933 रोजी देवकिसनजी सारडा यांचा जन्म झाला आणि 21 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे निधन झाले. 14 ऑक्टोबर हा जागतिक स्टँडर्ड डे (आयएसओ) गुणवत्ता दिन आहे. भाऊंनी आपल्या आयुष्यात नेहमीच गुणवत्तेला महत्त्व दिले आहे. तर 21 डिसेंबर हा जागतिक ध्यानधारणा दिन आहे. आत्मचिंतन व मनाचे महत्त्व भाऊंनी नेहमीच जाणले होते आणि त्या माध्यमातून ते प्रत्येक क्षेत्राचे वर्णन करीत होते.
आर्कि. डॉ. सचिन गुळवे, नाशिक सिटीजन फोरम

सारडा परिवाराकडून ऋण व्यक्त
भाऊंवर प्रेम करणारे नाशिकमधील सर्वजण येथे जमले व भाऊंबद्दल अनेक आठवणी सांगितल्या. भाऊंचे योगदान किती महत्त्वपूर्ण होते याची सर्वांना कल्पना आली व यातील काही गोष्टी आम्हालाही माहीत नसलेल्या होत्या. मोठे भाऊ श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न, उत्तुंग जीवन जगले. अतिशय समाधानी जीवन जगून ते गेले. नाशिकमधील अनेक संस्थांनी पुढाकार घेत वैकुंठवासी भाऊंना आदरांजली वाहिली. या प्रेमाबद्दल मी सारडा परिवारातर्फे ऋण व्यक्त करतो. हे असेच वाढत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
रामेश्वर देवकिसन सारडा

सचिन अहिरराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करत भाऊंबरोबरील भेटींचे अनेक किस्से सांगितले,पंडित वैरागकर व त्यांच्या विद्यार्थिनी यांनी पसायदान म्हणत शोकसभेची सांगता केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...