पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
महायुती सरकारकडून राज्यभरात भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून, नाशिकमध्येही या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंचवटी कारंजा येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन तिरंगा रॅलीस सुरवात करण्यात आली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा यशस्वी प्रत्युत्तर दिले. या यशस्वी मोहिमेनंतर देशभरात सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो नागरिक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत मातेच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. रॅली दरम्यान, भारतीय जवानांच्या शौर्याचे गान करण्यात आले आणि देशभक्तीपर गीते वाजवण्यात आली.
मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, भारतीय सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांच्या साहसाचे कौतुक करण्यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो.
रॅली पंचवटी कारंजा येथून सुरू होऊन पुढे रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, हुतात्मा स्मारक येथे समारोप करण्यात आला. यावेळी भारतमातेच्या जयघोषात करण्यात आला.रॅली दरम्यान, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.