नाशिक । देशदूत चमू
सिंहस्थकाळात कुशावर्तात स्नान करायचे ही प्रत्येक भाविकाची भूमिका असते. मात्र गर्दीचा ओघ लक्षात घेता बरेचसे भाविक परिसरातील घाटातून येणार्या गोदावरीच्या पाण्यात स्नान करून पुण्यप्राप्तीचा आनंद घेताना दिसतात. घाटांमुळे निदान काही प्रमाणात प्रशासनावरील नियोजनाचा भार कमी होण्यास मदत होत आहे. तरीसुद्धा त्यासाठी प्रशासनाने उभारलेल्या घाटांचे तेवढे पावित्र्य खरेच राखले जात आहे का, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्यावेळच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर भागात गोदाकाठावर अनेक घाटांची निर्मिती करण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने गोमुखातून येणार्या गोदावरी उगमस्थानजवळ अहिल्या घाट बांधण्यात आला होता. कुशावर्ताच्या पुढे नवा घाट उभारला होता. आज या घाटांची दुरवस्था पाहिल्यास त्यावेळी केलेला खर्च वाया गेला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अनेक वर्षांपूर्वी देशभरात नद्यांच्या काठांवर बांधलेले घाट आजही जसेच्या तसे उभे आहेत. बांधलेले घाट प्रदीर्घ काळासाठी उपयुक्त राहावेत, अशा प्रकारे घाटांची उभारणी करणे आवश्यक आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. दर बारा वर्षांनी नवा घाट बांधणे व जुन्या घाटाची दुरुस्ती करणे अशा तर्हेचे नियोजन योग्य नाही. बांधलेला घाट पुढील पर्वण्यांमध्येसुद्धा सक्षमपणे सेवा देईल, असे त्याच्या बांधकामाचे नियोजन करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
त्र्यंबकेश्वरच्या शाहीस्नानापाठोपाठ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता यावी म्हणून गोदावरी नदीकाठावर ठिकठिकाणी घाट बांधण्यात आले आहेत. सध्या या घाटांची स्थिती पाहता तेथे भाविकांनी स्नान करणे आज तरी अशक्य आहे. दुरवस्थेतील घाटांचा वापर पवित्र स्नानासाठी भाविक करतील का? अशीही विचारणा केली जात आहे. गेल्या सिंहस्थात कचरा डेपो परिसरात बांधलेल्या घाटाकडे भाविकांनी कानाडोळाच केला होता. कुशावर्तात स्नान करण्याला प्राधान्य देणारे भाविक या घाटावरील कुंडात स्नान करण्यास तयार होतील का? असाही मतप्रवाह आहे. घाटांची आजची दुर्दशा पाहता भाविकांनी तेथे स्नान तरी का करावे, असा प्रश्न भाविकांकडून विचारला जात आहे.
दगडी बांधकाम व्हावे
त्र्यंबकेश्वर शहरातून बाहेर पडणारे मलजल व सांडपाण्याचे व्यवस्थापन प्रशासनाने केले असले तरी ते तेवढे प्रभावी ठरलेले दिसत नाही. त्याचे यथायोग्य व्यवस्थापन झालेलेच नाही. शहरातून निघणार्या मलजलाचे वहन शुद्धीकरण केंद्रापर्यंत केलेले नसल्याचे दिसते. त्यामुळे गोदावरीच्या निर्मळ पाण्याऐवजी घाटांमधून गटारगंगाच वाहताना दिसत आहे. अनेक घाटांची तुटफूट झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीवर पुन्हा नव्याने खर्च करावा लागणार आहे. घाटांचे बांधकाम दगडी स्वरुपात केल्यास ते अनेक वर्षे टिकून राहतील. त्यांचा वापर सोयीचा ठरू शकेल.
साधुग्रामजवळ घाट सोयीचे
संत-महंतांच्या मते पेगलवाडी फाट्यावरील प्रयागतीर्थामागे गोदावरी नदी वाहती राहते. तेथे घाट बांधल्यास साधुग्रामजवळ घाट तयार होईल. पर्वणीसाठी येणार्या भाविकांनाही काही प्रमाणात येथे स्नान करून पवित्र स्नानाचा आनंद घेता येईल, असे मत व्यक्त होत आहे.
प्रयागतीर्थाची देखभाल गरजेची
कुशावर्ताप्रमाणे प्रयागतीर्थालाही सिंहस्थात विशेष महत्त्व आहे. तेथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी घाट बांधले आहेत. तेथे स्नान करून श्रावणात हजारो भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा सुरू करतात. या पवित्र स्थानाचे महत्त्व लोकांना पटवून देणे गरजेचे आहे. या तीर्थातील पाण्याचे योग्य पद्धतीने शुध्दीकरण केल्यास भाविकांना पर्वणीकाळात येथे स्नानासाठी येणे सहज शक्य होईल, असे म्हटले जात आहे.