त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
आज पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त (Monday of Shrawan) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. मंदिरात पहाटे विविध महापूजा आणि आरती झाली. त्यानतंर पहाटेपासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले असून ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असणार आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात वर्षभर भाविकांची (Devotees) दर्शनासाठी मोठी गर्दी असते. २५ जुलैपासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली आहे. आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी दर्शनासाठी (Darshan) पहाटेपासूनच भाविक रांगेत उभे आहेत. सुमारे जवळपास ४० ते ५० हजार भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान, सध्याची गर्दी (Crowd) पाहता सर्वसामान्य दर्शन रांगेतून दर्शनासाठी किमान सहा ते सात तास लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे देवस्थान ट्रस्टकडून भाविकांसाठी विविध व्यवस्था आणि सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून (Police) देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कुशावर्त, प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी
सकाळपासून भाविकांची कुशावर्त कुंडावर स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. याठिकाणी भाविक अंघोळ करून प्रदक्षिणा मार्गाकडे मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावर देखील भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. सध्या त्र्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस (Rain) सुरु असल्याने भाविकांनी रेनकोट आणि छत्रीचा आधार घेतल्याचे बघायला मिळत आहे.
गर्भ गृहदर्शन सर्व भाविकांकरिता असणार बंद
त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिन्यामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टकडून ग्रामस्थांना सकाळी मंदिर उघडल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत दर्शन वेळ असणार आहे. यासाठी रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र ग्रामस्थांसाठी बंधनकारक असणार आहे. तसेच गर्भ गृहदर्शन सर्व भाविकांकरिता या काळात बंद ठेवण्यात येणार असल्याची माहीती देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
पालखी सोहळा उत्साहात संपन्न
त्र्यंबकेश्वरला धो-धो पाऊस सुरु असताना पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. मंदिरातून त्र्यंबकेश्वराची सवाद्य पालखी निघाली. यात सात किलोची सोन्याची मूर्ती होती. कुशावर्तावर मूर्तीला स्नान घातले जाईल व पालखीचा मंदिरात सुमारे एक तास अभिषेक होईल.




