Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्यामहाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर चोवीस तास खुले

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर चोवीस तास खुले

त्र्यंंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

- Advertisement -

महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri )उद्या (दि.18) त्र्यंंबकेश्वर मंदिरात सुमारे तीन लाख शिवभक्त दर्शनार्थ येण्याची शक्यता असल्याने देवस्थान ट्रस्टने मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गर्भगृहात प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वराची महाशिवरात्रीला दुपारी पालखी काढण्यात येणार आहे. मध्यरात्री महापूजा होणार आहे. देवस्थानकडून भाविकांना गायत्री मंदिराजवळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करुन सजविण्यात आले आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार – उत्तर आणि पूर्व महाद्वार आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.

येणार्‍या भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून व त्याच्या दोन्ही विंग मधून करण्यात येणार आहे. दर्शनार्थ येणार्‍या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तातडीने दर्शन घेऊ इच्छिणार्‍या भाविकांसाठी देणगी दर्शन संपूर्ण दिवसभर सुरु राहणार आहे. देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनविण्यात आलेला आहे. पालखी मंदिरातून निघून पाचआळी मार्गे पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त कुंडावर जाईल. षोडशोपचार पूजा करुन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पालखी पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे.

महापूजा करताना ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी होईल. तर मध्यरात्री 12 ते 2:30 वाजेच्या दरम्यान महापूजा करण्यात येईल. देवस्थानकडून 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात शुक्रवारी (दि.17) संध्याकाळी 6.00 ते रात्री 7.30 वाजेपर्यंत प्रसिद्ध सितार वादक पं. निलाद्री कुमार यांचा सितारवादनाचा कार्यक्रम व रात्री 7.30 ते 9.00 वाजेपर्यंत कथ्थक नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.

दि. 18 रोजी दुपारी 2 वाजता रा.स्व.संघाकडून घोष वादन तसेच सायंकाळी 5:30 वाजता समूह बासरी वादन होईल.7:30 ते 8:30 यावेळेत कीर्तनकार चंद्रशेखर शुक्ल यांचा शिवस्तुती हा कार्यक्रम होणार आहे. दि. 19 रोजी सायंकाळी 7:00 वाजता पं.प्रसाद दुसाने यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटांगणात हे कार्यक्रम होणार आहेत.

जादा एसटी गाड्या

महाशिवरात्र पर्व काळासाठी नाशिक – त्र्यंबक मार्गावर राज्य परिवहन महामंडळाकडून जादा एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात येणार आहे.त्याचबरोबर नाशिक मनपाच्या सिटीलिंक या गाड्याही या मार्गावरून धावणार आहेत. या गाड्या रात्री उशिरापर्यंत सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमी भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या