नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
मुकिंदपूर येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सचिव मनीष अण्णासाहेब घाडगे यांनी पेटवून घेवून केलेल्या आत्महत्या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन घाडगे परिवारातील सदस्यांसह अन्य व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनीषा मनीष घाडगे (वय 40) रा. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संकुल मुकिंदपूर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझे पती मनीष अण्णासाहेब घाडगे हे मागील 15 ते 20 वर्षापासून त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सचिव म्हणून काम पाहत होते.
28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्राचार्य सोपान काळे व अनुराधा गोरे यांनी पतीच्या दालनात जावून सह्यांचे अधिकार काढून घेतल्याच्या ठरावावर सह्या मागू लागले. त्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर स्नेहल घाडगे, श्रुती घाडगे व सुमती घाडगे तिथे गेल्या व त्यांनी माझे पतीस मारहाण करुन तुझा घडा आता भरला आहे. तुझ्याविरोधात खोटी बदनामीची केस करावीच लागेल अशी धमकी दिली. त्यानंतर ते घरी आले व पुन्हा साडेबारा वाजता कार्यालयात गेले. त्यानंतर दुपारी 1 वाजता मला त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे कळाले.
ऑक्टोबर 2025 पासून 28 एप्रिल 2026 पर्यंत सोपान बाजीराव काळे (तेलकुडगाव), उनराधा उत्तम गोरे (रा. जळके), सुमती साहेबराव घाडगे, स्नेहल साहेबराव घाडगे, श्रुती साहेबराव घाडगे व चेतन चव्हाण रा. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संकुल मुकिंदपूर या सर्वांनी माझे पती मनीष अण्णासाहेब घाडगे यांनी सचिव पदाचा राजीनामा द्यावा व त्यांचे नावे असलेली मिळकत संस्थेच्या नावे करावी म्हणून खोट्या बदनामीच्या केसेस करण्याची धमकी देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 339/2026 भारतीय न्याय संहिता कलम 108, 115(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.




