Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशDonald Trump On Iran Attack : "इराण नौदलाचा विनाश करू, सर्व मिसाईल…";...

Donald Trump On Iran Attack : “इराण नौदलाचा विनाश करू, सर्व मिसाईल…”; तेहरानवर हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा इशारा

दिल्ली । Delhi

मध्य पूर्वेतील तणावाने आता युद्धाचे टोक गाठले असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईत अमेरिकेच्या सक्रिय सहभागाची अधिकृत पुष्टी केली आहे. इराणमध्ये अमेरिकेने मोठे ‘कॉम्बॅट ऑपरेशन’ (लढाऊ मोहीम) सुरू केले असून, इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू देणार नाही, असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

- Advertisement -

शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक भीषण स्फोट झाले. इस्रायली सैन्याने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयांजवळ आणि लष्करी तळांवर लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी या विशेष लष्करी कारवाईला ‘रोअर ऑफ द लायन’ (Roar of the Lion) असे नाव दिले असून, यात आता अमेरिकेनेही आपली ताकद झोकून दिली आहे.

या लष्करी कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, इराणच्या राजवटीकडून निर्माण झालेला धोका कायमचा संपवणे आणि अमेरिकन जनतेचे रक्षण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ट्रम्प यांनी इराणच्या शासनाला अत्यंत “कठोर आणि धोकादायक” असे संबोधले. त्यांनी पुढे म्हटले की, इराण पुन्हा एकदा आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करत असून, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. ही क्षेपणास्त्रे केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठीही मोठा धोका आहेत.

इराणच्या आक्रमकतेला उत्तर देताना ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका मांडली आहे. “आम्ही इराणची क्षेपणास्त्रे नष्ट करू आणि त्यांची संपूर्ण मिसाईल इंडस्ट्री जमिनीदोस्त करू,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. यासोबतच इराणच्या नौदलाचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, जेणेकरून तेहरानला अण्वस्त्रे मिळवणे अशक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ट्रम्प यांनी इराणी लष्कराच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) ला शस्त्रे खाली टाकून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई केवळ हवाई हल्ल्यांपुरती मर्यादित नसून सागरी मार्गानेही इराणला घेरले जात आहे. अमेरिकेने नुकतीच मध्य पूर्वेत आपली प्रचंड लष्करी संसाधने तैनात केली आहेत. यामध्ये USS Gerald R. Ford आणि USS Abraham Lincoln या दोन महाकाय युद्धनौकांचा समावेश असून, त्या इराणच्या अगदी जवळ तैनात करण्यात आल्या आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यातच इराणमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्याविरोधात स्थानिक जनतेने मोठे आंदोलन सुरू केले आहे. अंतर्गत उठाव आणि बाहेरून अमेरिका-इस्रायलचे लष्करी हल्ले यामुळे खामेनेई यांच्यासमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. या कारवाईमुळे जागतिक राजकारणात आणि विशेषतः मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...