राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
मुळा धरणाच्या भिंतीलगत जिलेटीनच्या कांड्या शेतकर्याच्या दुचाकीला लावून स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न शेतकर्याच्या प्रसंगावधानतेमुळे फसला. आता या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. शुक्रवारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.
दरम्यान, राहुरी पोलीस ठाण्यात बाळासाहेब मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात जीव घेण्याच्या प्रयत्नासह मुळा धरणाच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कटाचे सूत्रधार शोधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मुळा धरणाच्या भिंतीजवळच स्फोट घडविण्याचा प्रयत्न झाल्याने पाटबंधारे व पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गुरूवारी सायंकाळी मुळा धरणाच्या भिंतीलगत शेती असलेल्या बाळासाहेब मंडलिक या शेतकर्याच्या दुचाकीला जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. मात्र, तो प्रयत्न सपशेल फसला. या घटनेमुळे परिसरासह नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुळा धरणाची सुरक्षितता रामभरोसे बनली आहे. पाटबंधारे खात्याचे अधिकारी धरणस्थळी फिरकत नाहीत. तर धरणाच्या बंदोबस्तासाठी पोलिसच नसल्याने मुळा धरण परिसरात मोठी गुन्हेगारी बोकाळली आहे.
अनेक हौशी पर्यटक मुळा धरण परिसरात खुलेआम फिरत आहेत. तर यापूर्वी अनेक निष्पाप तरूणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुळा धरणस्थळी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. तर काही सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून नादुरूस्त आहेत. मात्र, त्याकडे पोलिसांसह पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. मुळा धरणात जिलेटीनचा स्फोट घडवून बेकायदा मासेमारी केली जाते. अशा मासेमारी करणार्यांबरोबर पाटबंधारे व पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध निर्माण झाल्याने धरणाच्या पाण्याला विषारी किनार येऊन हे पाणी दूषित झाले आहेत. तर जिलेटीनमुळे अनेक जलचर प्राणी मृतावस्थेत आढळूनही त्याकडे पाटबंधारे व पोलीस खात्याचे दुर्लक्ष होत आहे.
धरणाच्या भिंतीवर सर्रासपणे वाहतूक चालू आहे. त्यावर कोणाचेही निबर्ंध राहिलेले नाहीत. मुळा धरणाचे अभियंता आणि उपअभियंत्यांनी धरणाच्या सुरक्षिततेकडे डोळेझाक केली आहे. याठिकाणी संबंधित अधिकारी फिरकतच नसल्याने मुळा धरणस्थळाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुळा धरणस्थळी एवढी गंभीर घटना घडूनही पोलीस खाते व पाटबंधारे खाते याबाबत उदासिन आहेत. पोलिसांनी चौकशीचा फार्स केला तर पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी याबाबत कानावर हात ठेवून त्याकडे कानाडोळा केल्याने संतापलेल्या नागरिकांनी पोलीस खात्यातील अधिकारी व पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे.