Saturday, May 25, 2024
Homeनगर‘एमबीबीएस’ अ‍ॅडमिशनच्या नादात घातले साडे बारा लाख

‘एमबीबीएस’ अ‍ॅडमिशनच्या नादात घातले साडे बारा लाख

अहमदनगर (प्रतिनिधी)

मुलाचे ‘एमबीबीएस’साठी अ‍ॅडमिशन करून देतो, असे सांगून एका ठगाने दोन टप्प्यात ऑनलाईन 12 लाख 49 हजार रूपये घेत खासगी नोकरदाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुकुंदराव यशवंतराव शिंदे (वय 48 रा. हनुमान गल्ली, टाकळी खातगाव, ता. नगर) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे.

- Advertisement -

ही घटना 5 जुलै 2023 ते 9 ऑगस्ट 2023 दरम्यान घडली असून याप्रकरणी शिंदे यांनी 11 ऑगस्ट रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून कोटक महिंद्रा बँकेच्या अनोळखी अकाऊंट नंबर धारकाविरूध्द फसवणूक सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांना त्यांच्या मुलाचे ‘एमबीबीएस’साठी अ‍ॅडमिशन घ्यायचे होते. ते अ‍ॅडमिशनसाठी प्रयत्न करत असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. तुमच्या मुलाचे ‘एमबीबीएस’साठी अ‍ॅडमिशन करून देतो, असे सांगून एका मेलवरून कॉलेजचे बनावट कागदपत्रे पाठविले. तसेच एका बनावट वेबसाईटवर मुलाचे नीट उत्तीर्ण झाल्याचे कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले. ‘एमबीबीएस’ शिक्षणासाठी आवश्यक असणारी फी कोटक महिंद्रा बँकेत भरण्यास सांगितली.

समोरच्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे शिंदे यांनी कोटक महिंद्रा बँकेत सुरूवातीला पाच लाख 56 हजार व नंतर सहा लाख 93 हजार रूपये, असे दोन टप्प्यात एकुण 12 लाख 49 हजार रूपये भरले. मुलाचे अ‍ॅडमिशन न झाल्याचे समजताच शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत सदरचा प्रकार सांगितला. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या