Sunday, September 15, 2024
Homeनगर‘गांधी फिनकॉर्प’च्या भाग भांडवलाचे अडीच कोटी बँकेच्या घोटाळ्यातील?

‘गांधी फिनकॉर्प’च्या भाग भांडवलाचे अडीच कोटी बँकेच्या घोटाळ्यातील?

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच गांधी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनीच्या भाग भांडवलासाठी वापरलेली 2.50 कोटींची रक्कम बँकेच्या घोटाळ्यातीलच असावी. याच कंपनीमार्फत बँकेच्या घोटाळ्यातील रकमा देशाबाहेर नेल्याची शक्यता कर्ज फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी आशुतोष लांडगे याने व्यक्त केली आहे. 150 कोटींच्या घोटाळ्याच्या तपासात या कंपनीचीही चौकशी करावी, अशी मागणी करत यातून सर्व पुरावे समोर येतील, असा दावाही लांडगे याने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेल्या पत्रात केला आहे.

आशुतोष लांडगे याने नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहाराबाबत सुरू असलेल्या तपासात याबाबत माहिती देत काही कागदपत्रेही सादर केली आहेत. लांडगे याने पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले की, तत्कालीन चेअरमन माजी खासदार स्व. दिलीप गांधी व बँक कर्मचार्‍यांनी परस्पर माझ्या व इतर खातेदारांच्या खात्यातून व कर्ज खात्यातून वेगवेगळ्या इतर खात्यात पैसे वर्ग करून फसवणूक केल्याचे समोर आलेले आहे. गांधी फिनकॉर्प लिमिटेड कंपनी ही 2017 मध्ये म्हणजेच अर्बन बँकेत कर्ज फसवणूक झाल्याच्याच वर्षी स्थापित झालेली आहे. या कंपनीच्या भाग भांडवलाचे 2.50 कोटी अर्बन बँक घोटाळ्यातीलच असण्याची दाट शक्यता आहे. बँक घोटाळ्यातील रोख रकमा सुवेंद्र दिलीप गांधी व देवेंद्र दिलीप गांधी व त्यांचे भागीदार जयदीप पाटील यांनी गांधी फिनकॉर्प या कंपनीमार्फत देशाबाहेर नेऊन विल्हेवाट लावली असावी.

दिल्लीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सुवेंद्र दिलीप गांधी बँकेच्या फसवणूक प्रकरणातील मोठ्या रकमा कोर्ट किंवा सदर प्रकरणातील फिर्यादीकडे जमा करण्याची दाट शक्यता आहे. याची सखोल चौकशी होऊन अर्बन बँकेच्या घोटाळ्यातील रोख रकमांची कशी विल्हेवाट लावली, याची शहानिशा होणे आवश्यक आहे. सुवेंद्र दिलीप गांधी, देवेंद्र दिलीप गांधी यांची चौकशी केल्यास तेच नगर अर्बन बँकेच्या 150 कोटी घोटाळ्यातील पडद्यामागचे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळतील, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. तपासासाठी कागद पत्रे सादर करत असल्याचे लांडगे याने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या