अहिल्यानगर (प्रतिनिधी)
घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथे झाडे लागवड करण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्कीने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कविता स्वामी चव्हाण (वय 25, रा. घोसपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. विठ्ठल हंडोरे (पूर्ण नाव माहिती नाही), संतोष भगवंत खोबरे (दोघे रा. घोसपुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी कविता या 2 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास आपल्या घरी असताना, घराच्या पाठीमागील स्मशानभूमीजवळ विठ्ठल हंडोरे व संतोष खोबरे हे झाडे लावण्यासाठी जेसीबी मशीन घेऊन आले.
फिर्यादी यांनी त्यांना कामाबाबत विचारणा केली असता संशयित आरोपींनी येथे झाडे लावायची आहेत, तुमचे घरसुध्दा येथे काढावे लागेल असे सांगितले. त्यावर फिर्यादींनी विरोध व्यक्त केला असता संशयित आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्कीने मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली.
मारहाणीमध्ये जखमी झालेल्या फिर्यादींना उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 5 ऑगस्ट रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी त्यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात हजेरी लावून फिर्याद दिली. अधिक तपास अहिल्यानगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती करीत आहेत.




