अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडीतील पद्मानगर भागात किरकोळ वादातून तिघा तरुणांनी एक 19 वर्षीय युवक व त्याच्या मावस भावावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (20 एप्रिल) रात्री घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अभि व्यंकटेश तिरंदास, वेदान्त व्यंकटेश तिरंदास व निखील दोन्ता (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. पद्मानगर, सावेडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी अक्षय अनिल मिरचंदानी (वय 19, रा. साईनगर, तपोवन रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रविवारी रात्री 7.30 च्या सुमारास ते व त्यांचा मावस भाऊ यश निखील मोरे हे दोघे दुचाकीवरून जात असताना पद्मानगरमधील घागरे यांच्या किराणा दुकानासमोर वरील तिघांनी त्यांची दुचाकी अडवून शिवीगाळ करत अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यात निखील दोन्ता याने कोयत्याने अक्षयच्या कानावर वार केल्याने त्याला कानातून रक्तस्राव झाला.
वेदान्त तिरंदास याने चाकूच्या मुठीने डोक्यावर मारले तर अभि तिरंदास याने निखील मोरेच्या कमरेवर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून घटनास्थळी फिर्यादीचे मावशी अर्चना वारे व काका मुकुंद वारे हे धावून आले असता संशयित आरोपींनी त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र घटनास्थळी लोकांची गर्दी जमल्याने संशयित आरोपी तिथून पळून गेले. जखमींना तत्काळ रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.