मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
तालुक्यातील पिंपळशेवडी जवळील कजवाडेलगत असलेल्या पाझर तलावात खेळताना तोल जाऊन पडल्याने क्रंकाळे गावातील आठ वर्षीय बालकासह सहा वर्षीय बालिकेचा पाण्यात बुडून अंत झाला. या घटनेने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील कंक्राळे येथील सुनील बुधा पवार (8) या बालकासमवेत त्याच्या घराशेजारी राहणारी सहा वर्षीय मुलगी रोहिणी निकम व गावातील चार ते पाच मुले गावाजवळील पाझर तलावात खेळत खेळत पाण्याजवळ पोहोचले.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुनील पवार व त्याच्या शेजारी राहणारी मुलगी रोहिणी हे दोघे तलावातील पाण्यात तोल जाऊन पडल्याने पाण्यात बुडाले. दोघेजण तलावात बुडाल्याचा हा प्रकार अन्य लहान मुलांनी पाहताच त्यांनी घाबरून तेथून पळ काढला व घडलेली घटना गावात येऊन नागरिकांना सांगितली.
नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाण्यात बुडालेल्या सुनील पवार व बालिका या दोघांचे मृतदेह पाण्यातून काढले. या पाझर तलावात 10 ते 15 फूट पाणी आहे. मुख्य चारीत दोघेजण बुडाले होते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पिंपळशेवडी गावाजवळील कजवाडे येथे घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी शोकाकूल वातावरणात दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेची माहिती पोलीस पाटील एकनाथ दासनारे यांनी पोलिसांना देताच पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिंमत चव्हाण करत आहेत.