नाशिक। प्रतिनिधी Nashik
दुचाकी व अल्टो कारच्या अपघातात कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला धडकून झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वारासह कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी रोडवर घडली. वैभव कचरू राजगुरु (२७, रा. वलखेड, ता. दिंडोरी) व मनोज ओमकार पवार (३६, रा. वरवंडी रोड, म्हसरुळ) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.
मनोज हा त्याच्या दुचाकीवरून दिंडोरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी म्हसरुळ शिवारात हॉटेल शिवराज समाेर अल्टो कारमधून वैभव राजगुरु इतर तिघांसोबत नाशिकहून दिंडोरीच्या दिशेने जात होता. त्यावेळी दुचाकीस्वार मनाेजला धडक दिली. त्यानंतर कार रस्त्यालगत थांबलेल्या पिकअपवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात मनाेजच्या डोक्यास दुखापत झाली, तर वैभवही गंभीर जखमी झाला. दोघांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, दोघांचाही मृत्यू झाला. म्हसरुळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकी घसरून भाऊही जखमी
अपघाताची माहिती मिळताच मनाेजचा चुलत भाऊ प्रसाद याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथून रुग्णालयात दाखल करताना प्रसाद हा त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिरावाडी येथे दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात प्रसादही गंभीर जखमी झाला आहे. एकापाठोपाठ दोन मुलांचा अपघात झाल्याने पवार कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.