Sunday, September 29, 2024
Homeनगरसंगमनेरच्या दोन गरोदर महिलांना झिका

संगमनेरच्या दोन गरोदर महिलांना झिका

पाच महिन्यांपेक्षा अधिकचा गर्भ || आरोग्य विभाग ठेवणार ‘वॉच’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

संगमनेर शहरातील दोन गरोदर महिलांचा झिका विषाणूचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या महिलांचे गर्भाचे वय हे पाच महिन्यांपेक्षा अधिक असून त्यांना कोणतीही विशेष लक्षण नसली तरी जिल्हा आरोग्य विभाग आता या महिलांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवणार आहे. तसेच काही आरोग्य विषयक समस्या उद्भावल्यास पुढील उपचारासाठी संदर्भीत करणार आहे.

- Advertisement -

साधारण दीड महिन्यांपूर्वी संगमनेरमधील एका रुग्णावर नाशिकमध्ये उपचार सुरू असताना तेथील खासगी रुग्णालयाने केलेल्या तपासणीत त्याला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, तो रुग्ण बरा होऊन संगमनेर येथे परतल्यानंतर नाशिक महापालिकेने पुन्हा रुग्णाचे रक्त नमुने घेऊन ते तपासले असता त्याला झिका होऊन गेल्याचे समोर आले होते. यात सुमारे महिनाभराचा कालावधी गेल्यानंतर नाशिक मनपा आरोग्य विभागाने नगर जिल्हा आरोग्य विभागाला याबाबत कळवले होते. त्यानूसार नगर आरोग्य विभागाने संबंधीत संगमनेर शहरात राहणारा रुग्ण आणि त्याच्या रहिवासी भागातील गरोदर 27 महिलांचे रक्त घेऊन तपासणीसाठी पाठवले होते.

तपासणीअंती यातील दोन गरोदर महिलांचे झिकाचे नमने पॉझिटीव्ह आलेले आहेत. मात्र, या गरोदर महिलांमध्ये कोणतेच लक्षण नाहित. झिका विषाणूचा प्रार्दुभाव गरोदर महिलामधील बाळाच्या थेट मेदूंवर होत असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने संबंधीत महिलांची सोनेग्राफी केलेली असून ती सामान्य आलेली आहे. मात्र, उपाययोजना म्हणून आता आरोग्य विभाग या दोन गरोदर महिलांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवणार आहे. तसेच संगमनेर दोन दिवसांपासून पुन्हा नव्याने संपूर्ण शहराचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

संगमनेरमध्ये आतापर्यंत तीन बाधित
संगमनेर शहरात झिका रुग्णाने बाधित असणार्‍यांची संख्या आता 3 झाली आहे. आधी संगमनेरच्या रुग्णावर नाशिकमध्ये उपचार झालेले असून आता दोन गरोदर महिलांचे अहवाल झिका पॉझिटीव्ह आलेले आहेत. अजून काही गरोदर महिलांचे अहवाल तपासून येणे बाकी असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. तसेच गेल्या दोन महिन्यांत संगमनेरमध्ये स्वाईन फ्ल्यूचा एक रुग्ण पाझिटीव्ह आला असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई-पुणे कनेक्शन
संगमनेर शहर आणि तालुका हा नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि दूध हे पुणे, मुंबई आणि नाशिकला जाते. या शहरातील शेतकर्‍यांसह भाजी विक्रेत्यांचा मुंबई-पुणे या बड्या शहरांशी संपर्क असल्याने संसर्गा धोका वाढला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या