समाजमाध्यमांचा समाजावरचा, विशेषतः युवा पिढीवरचा प्रभाव आता नवा नाही. त्यातील नावीन्य ओसरले असून त्या प्रभावातील नकारात्मकता हा आता चिंतेचा विषय आहे. त्यात भर पडू शकेल असे वृत्त माध्यमात अधूनमधून प्रसिद्ध होते. पुण्याच्या विश्रातवाडी भागात एक घटना घडली. दक्षिण कोरियात नृत्य शिकण्यासाठी दोन शाळकरी मुली घर सोडून पळून गेल्या. दोघीही आठवीत आहेत. त्या मुली समाजमाध्यमांवरील त्या नृत्याच्या फॅन होत्या. त्यांच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनीही वेळेत तपास केला.
मुली रेल्वेने पुण्याहून मुंबईला गेल्या होत्या असे तपासात निष्पन्न झाले. दादर रेल्वे स्थानकासमोरील एका टॅक्सी चालकाला मुलींचा संशय आला. त्यानेही पोलिसांना माहिती दिली. सर्वांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी पोलिसांनी मुलींना दादर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. चौकशी करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. ही पहिलीच घटना नाही. समाजमाध्यमांचे आकर्षण वाढत आहे. अजाणत्या वयाच्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये असे तज्ज्ञ म्हणतात. तथापि ऑनलाईन शिक्षणाने ती मुभा पालकांकडे राहिलेली नाही. अभ्यास या कारणासाठी किंवा त्याच्या नावाखाली मोबाईल मुलांकडे दिला जातो. मुले त्यावर अभ्यास करतही असतील. पण समाजमाध्यमांवर मुशाफिरीही करतात हे नक्की. अडनिड्या वयात मुलांच्या हातात अवघे जग सामावते. नकोशा जगाचा किंवा डार्क वेबचा परिचय होण्याचा धोका वाढतो. समाजमाध्यमांवरील मजकुराचा दर्जा हा गंभीर विषय आहे. मुले या आभासी जगात रमली नाही तरच नवल. त्यांच्याच वयाची काही मुले समाजमाध्यमांवर प्रभावी व्यक्ती असतात. समाज त्यांना डोक्यावर घेतो. माध्यमेही त्यांचे कौतूक करण्यात तसूभरही मागे नसतात. त्या मुलांची समज, त्यांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास यावर भर न देता त्यांना मिळणारी प्रसिद्धी, क्वचित त्यांची आर्थिक कमाई, त्यांचे चालणे, बोलणे, त्यांचा पोशाख, मॅचिंग याचीच दखल घेतात. ही पिढी स्मार्ट आहे. त्यामुळे बोलघेवडेपणा हा अनेकांचा अंगभूत गुण बनतो. अशा मुलांना कॉपी करण्याची, त्यांच्यासारखे होण्याची महत्वाकांक्षा त्यांचाच वयाच्या मुलांमध्ये जागी होते आणि मग मुले अकारण नको ते धाडस करतात. पौगंडावस्थेतील मुलांची समज त्यांच्या वयाला साजेल अशीच असते. तथापि किती पालक याबाबतीत सजग असतात? मुलांच्या आभासी जगात डोकावून पाहातात? किती पालक मुलांची समाजमाध्यमांविषयी समज वाढवतात? किती पालक स्वतः समाजमाध्यमांचा विवेकी वापर करतात? पालकच त्यात रमत असतील तर मुले रमणारच. या सगळ्याचा नकारात्मक प्रभाव सामाजिक मूल्यांवर पडतो. आधीच त्यांची घसरण सुरु आहे. ती अधिक वेगाने होणाचा धोका वाढतो. समाजमाध्यमांच्या वापराची साक्षरता वाढवणे गरजेचे आहे. तो शालेय अभ्यासक्रमाचा विषय बनवला जावा. पालकांनी ती जाणीवपूर्वक शिकायला हवी. मुलांच्या आभासी दुनियेत काय चालले आहे हे माहित करून घ्यायचे असेल तर पालकांना मुलांसारखा विचार करता यायला हवा. त्यांच्याशी मोकळा संवाद असायला हवा. अनेकदा मुले उत्साहाने काहीतरी सांगू पाहातात. ते तेवढ्याच उत्सुकतेने आणि सजगपणे ऐकायला हवे. त्यातून मुलांच्या मनाचा थांग कदाचित पालकांना लागू शकेल. हे अवघड वाटू शकेल पण अशक्य नाही. मुलांचे भवितव्य उत्तम घडावे, त्यांनी चांगला माणूस बनावे आणि त्यांच्या भावविश्वात कोणतीही पडझड घडू नये अशीच पालकांची इच्छा असते. त्यासाठी पालकांनाच जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्याला पर्याय नाही.