अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सीएनजी गॅस वाहतूक करणारे वाहन व कारच्या धडकेत कारमधील एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. 5 जानेवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील साईनाथ हॉटेलजवळ, काळेवाडी, हिवरेझरे (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. दरम्यान, याप्रकरणी 21 जानेवारी रोजी सीएनजी गॅस वाहतूक करणार्या वाहन चालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद दशरथ काळे (वय 49 रा. काटवन खंडोबा रस्ता, जाधव मळा, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.
अमोल भास्कर ढोरजकर (वय 35 रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात स्विफ्ट कारमधील संपत भास्कर ढोरजकर (वय 39 रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, मयत संपत ढोरजकर यांचा मुलगा संग्राम आणि पुतण्या हर्ष हे जखमी झाले आहेत. संपत, मुलगा संग्राम व पुतण्या हर्ष एका कार्यक्रमासाठी कार मधून जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. काळे याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडली. स्विफ्ट कारला धडक दिल्यामुळे कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार वणवे करत आहेत.