नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मध्य प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री उशिरा मिनी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग- ३९ वरील सिद्धी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपनी गावानजीक हा अपघात झाला. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले. या जखमींपैकी ९ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
मुलाच्या मुंडन समारंभासाठी सर्व नातेवाईक मिनी बसने जात असताना अपघात झाला. मटिहानी गावातील २२ जण एका मिनी बसमधून प्रवास करत होते. मंदिरामध्ये पोहचण्यापूर्वीच वाटेमध्ये भरधाव ट्रकने मिनी बसला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ९ जणांना रेवा येथील संजय गांधी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. तर पाच जणांवर सिधी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बहरी रोडवरील उपनी गावाजवळ घडली.
मृत्यू झालेले सर्वजण साहू कुटुंबातील आहेत. हे सर्वजण बहरीतील देवरी आणि पंडारिया या गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि ३ पुरूषांचा समावेश आहे. या घटनेनंतर साहू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा