नाशिक । अनिरुद्ध जोशी Nashik
सक्तीच्या टाळेबंदीला ( Lockdown ) आज दोन वर्षे पूर्ण झाली. याकाळात माणसाच्या जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल घडवले. त्याचाच हा धांडोळा..
गेल्या दोन वर्षांपासून करोनाचा (corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला अनेकदा लॉकडाऊन ( Lockdown ) लावावा लागला. याकाळात अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले तर अनेकांना रोजगारालाही मुकावे लागले. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांच्या जीवनशैलीत बदल झाला. अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील असलेली दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले.
मुंबई, पुणेसारख्या बड्या शहरात नोकरीसाठी गेलेली मंडळी करोना अन् लॉकडाऊनच्या भीतीने आपल्या मूळ गावी परतली. आयुष्यातील पहिलीच भली मोठी सुट्टी सगळ्यांना अनुभवायास मिळाली. सुरुवातीला कुटुंबांमध्ये संवाद तितकासा नव्हताच, पण दोन दिवस उलटताच कुटुंबात संवाद वाढायला लागला. कौटुंबिक चर्चा होऊ लागल्या. भूतकाळातील जुने पुराने किस्से रंगू लागले. संकटकाळात आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहर्यावर हास्य आणि सकारात्मकता पसरवण्याकडे लक्ष केंद्रित केले गेले.
लॉकडाऊनकाळात मनोरंजनासाठी अनेक कुटुंबियांनी इनडोअर गेम्सचा मार्ग निवडला. आई, वडील, मुले, नातू, मुली, भाऊ, बहिणी घरातील सर्वच सदस्य एकत्र येऊन लुडो, पत्ते, बुद्धिबळ, गाण्याच्या भेंड्या यांसारखे गेम्स तासन्तास खेळून आपल्या कुटुंबियांसोबत क्वालिटी टाईम घालवू लागले. गेम्स खेळून कंटाळा आला की चित्रपट, गाणी, मालिका आणि सोबत नानाविध खाद्यपदार्थांसोबत मैफिली रंगू लागल्या.
ज्येष्ठ नागरिकांनी आपली मुले आणि नातवांकडून सोशल मीडियाबाबत माहिती जाणून घेतली. फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत तुटलेली मैत्री पुन्हा नव्याने जोडण्यास सुरुवात केली. एरवी मेसेजवर बोलणारी तरुणाई आपल्या मित्र-मैत्रिणींना थेट फोन करून तासन्तास गप्पा मारण्यात दंग झाली. लहान मुलांना संस्कार देण्यासाठी घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन प्रार्थना म्हणू लागले. सासू-सुनांचे रुसवे-फुगवे दूर होऊन सुसंवाद होण्यास सुरुवात झाली.
महिलांनी अनेक प्रकारच्या पाककृती करून आपल्या परिवाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न केला. जे पदार्थ प्रामुख्याने हॉटेलमध्येच जाऊन खावे लागत ते पदार्थ घरी बनण्यास सुरुवात झाली. एकंदरीतच हसी मजाक, नोकझोक असेच काहीसे वातावरण कुटुंबात दिसून आले.
आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी लॉकडाऊनच्या काळात घालवण्याची संधी मिळाल्याने अनेकांनी या वेळेचा सदुपयोग केला. प्रत्येक प्रतिकूल परिस्थिती आपल्यासोबत मोठ्या संधीचे बीज घेऊन येते. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा परिस्थिती कशीही असो जीवनात अनेक नव्या संधी उपलब्ध होतात, असेच हा लॉकडाऊनचा काळ शिकवून जातो.