खामगाव – Khamgaon
शेतात पेरणी करीत असलेल्या कुटुंबावर 10 ते 12 जणांनी शेतीच्या वादातून केलेल्या हल्ल्यामध्ये दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील चिंचपूर येथे 1 जुलै रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे चिंचपूर गावात एकच दहशत माजली असून पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
तालुक्यातील चिंचपुर शिवारातील शेतात 1 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास शे. कासम शे जान मोहमद (33) व मोहमद खान तुराबखान (34), शकीलाबी अल्यारखाँ (40) व शरीफाबी तुराफखाँ (50) सर्व रा. चिंचपूर हे पेरणी करीत असताना गावातील एका गटातील व्यक्तींनी हरकत घेवून शेतात पेरणी करण्यास मनाई केली. यामुळे दोन्ही गटात वाद झाला. टॉमी व शस्त्रांचा वापर करुन 10 ते 12 जणांच्या गटाने उपरोक्त चौघांवर हल्ला केला. यामध्ये शे. कासम शे जान मोहमद (33) व मोहमद खान तुराबखान (34) रा. चिंचपूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शकीलाबी अल्यारखाँ (40) व शरीफाबी तुराफखाँ (50) या दोघी गंभीर जखमी झाल्या त्यांना ताबडतोब शहरातील एका खाजगी रुग्णालयात भरती केले आहे. तर मृतकांना सामान्य रुग्णालय येथे आणण्यात आले होते. याबाबतची माहिती मिळताच हिवरखेड पोलिस सामान्य रुग्णालयात दाखल झाले होते. वृत्त लिहपर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही.