Saturday, September 26, 2026
Homeक्राईमCrime News : उबेर चालकाला लुटणारी टोळी बीड जिल्ह्यात पकडली

Crime News : उबेर चालकाला लुटणारी टोळी बीड जिल्ह्यात पकडली

चोरीची कार व साहित्य जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी युट्युबवर चोरीच्या पध्दती पाहून उबेर अ‍ॅपव्दारे कार बुक करत चालकाला लुटणार्‍या तीन जणांच्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संशयित आरोपींकडून जबरी चोरी केलेली कार तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

विशाल सूर्यकांत कट्टीमणी (रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड, पुणे) हे उबेर चालक म्हणून काम करतात. 13 जून रोजी रात्री उबेर अ‍ॅपवरून वाकडेवाडी एस.टी. स्टँड, पुणे ते माळेवाडी (ता. शेवगाव) असे भाडे बुक करण्यात आले होते. त्यानुसार कट्टीमणी यांनी प्रवाशांना घेऊन प्रवास सुरू केला. 14 जून रोजी पहाटे 3.40 वाजण्याच्या सुमारास खोसपुरी (ता. अहिल्यानगर) शिवारातील हॉटेल रिलॅक्सजवळ लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबविण्यात आली. त्यानंतर कारमध्ये असलेल्या तिघांनी चालकाच्या डोक्याला बंदूक लावून त्याला धमकावले. संशयित आरोपींनी त्याचे हात बांधले, डोक्यात टणक वस्तूने मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत त्याला कारखाली ढकलून दिले. त्यानंतर कारमधील रोख रक्कम, सोन्याची अंगठी आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण पाच लाख 70 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लुटून संशयित पसार झाले. या प्रकरणी 15 जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना तपास पथके स्थापन करून संशयित आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि अन्य गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. तपासादरम्यान विशाल सोमनाथ तांगडे (वय 19), तुळशीराम उर्फ राम पंढरीनाथ चव्हाण (वय 21) आणि कल्याण उर्फ बबलू रामेश्वर गायकवाड (वय 19, तिघे रा. आनंदवाडी, ता. गेवराई, जि. बीड) यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिसांचे पथक बीड जिल्ह्यातील आनंदवाडी येथे पोहोचले. संशयित आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला असता त्यांना पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने तिघांनाही ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, अमंलदार राकेश खेडकर, शैलेश रोहोकले, दीपक फंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, राहुल गुंड्डू, अरूण सांगळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

युट्युबवरून चोरीची क्लृप्ती शिकली
संशयित आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला. झटपट पैसे कमावण्यासाठी त्यांनी युट्युबवर अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या क्लृप्त्या पाहिल्या होत्या. त्यानंतर उबेर अ‍ॅपवर बनावट ओळख वापरून कार बुक करण्यात आली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करण्यात आला. तसेच चोरीनंतर कारचे जीपीएस काढून टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : पीक कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफीसह सर्व सवलती लागू;...

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर...