अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, संनियंत्रण समिती यांनी शिफारस केलेल्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी निश्चित केलेल्या 10 गावांमध्ये ‘मधाचे गाव’ योजना राबविण्यासाठी करावयाच्या खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेतील उडदावणे या गावाचा समावेश आहे.
मधमाशीपालन हा राज्यातील एक महत्त्वाचा जोडधंदा होऊ पाहत आहे. मधमाशा या केवळ मध आणि मेणच देत नाहीत तर त्या परपरागीकरणामुळे शेती पीक उत्पादनात 35 ते 40 टक्के वाढ करतात, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे. त्यामुळे गावाच्या सकल उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मधाचे गाव ही संकल्पना पुढे आली. त्यातूनच आता दुसरा टप्पा होत आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार (1) घोलवड, ता.डहाणु जि. पालघर, (2) भंडारवाडी, ता.किनवट, जि. नांदेड (3) बोरझर, ता. नवापूर, जि. नंदुरबार (4) काकडदाभा, ता. औढ़ानागनाथ, जि. हिंगोली (5) चाकोरे, ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक (6) उडदावणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर (7) शेलमोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी (8) सिंधीविहीर, ता. कारंजा, जि. वर्धा (9) सालोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा (10) आमझरी, ता. अमरावती, जि. अमरावती या 10 गांवात मधाचे गाव ही योजना राबविण्यासाठी एकूण रु.5,01,97,000/- अक्षरी रुपये पाच कोटी, एक लाख, सत्याण्णव हजार मात्र) इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास अटींच्या अधिन राहून प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
योजना कार्यान्वित झाल्यानंतर पुढील वर्षांसाठी योजना कार्यान्वीत रहावी याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गावावर राहील, याबाबतचे हमीपत्र संबंधित ग्रामपंचायतीकडून घेण्यात येणार आहे. ज्या गावांमध्ये शासनाने मंजूर केलेल्या निधीपेक्षा जास्त खर्चाची आवश्यकता भासेल, तो खर्च अन्य योजनेअंतर्गत असलेल्या निधीमधून उपलब्ध करुन देण्याची मुभा जिल्हाधिकार्यांना राहील. मधपेट्यांसाठी लागणारी 10 टक्के रक्कम लाभार्थ्यांना द्यावी लागणार आहे. 90 टक्के रक्कम सरकार देणार आहे.