मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन (Waghya Statue) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अनेक नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यावर आता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी भाष्य करत सरकारला खडेबोल सुनावले आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात आमचे सगळं ऐकले पाहिजे. असे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवे. अवमान आणि दंगलीला (Riot) कारणीभूत कोण ? मुख्यमंत्री (CM) आणि सरकार काय बोळ्याने दूध पितात का? असे म्हणत उदयनराजेंनी सरकारला घरचा आहेर दिला.
पुढे ते म्हणाले की, “महापुरुषांविरोधात वक्तव्य करणारा हा कायदा अजामीनपात्र करा. याबाबत अधिवेशन बोलवले नाही तर त्याचा अर्थ असा होईल की यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान मान्य आहे. हा कायदा तुम्ही पारीत केला तर राहुल सोलापूरकर, कोरटकर यासारखी लोक धाडस करणार नाहीत. या कायद्यात महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद केली पाहिजे. कायदा बनवायला कोणत्याही बजेटची गरज नसते. त्यामुळे आता हा कायदा करुन फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून ट्रायल झाली पाहिजे”, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
देशात एकच वाघ ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
यावेळी बोलतांना उदयनराजे म्हणाले की, “देशात एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याची नोंद नाही. त्यामुळे हा वाघ्या कोण? यामुळे सत्य शोधण्यासाठी इतिहासकारांची एक समिती बसवा. त्या वाघ्या कुत्र्याबाबत धनगर समाज, होळकर यांचा संबंध काय?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.