मुंबई | Mumbai
छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत रायगडावर (Raigad) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे काही मागण्या केल्या.
यावेळी उदयनराजे म्हणाले की, “आज एका थोर व्यक्तीला नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत. समतेचा विचार त्यांनी दिला होता. एक युगपुरुष होऊन गेला ज्याने आयुष्य लोकांसाठी वेचले. स्वराज्याची स्थापना केली, लोकशाहीचा विचार त्यांनी दिला होता. लोकसहभाग राज्य कारभारात असला पाहिजे, त्याचा मूळ पाया त्यांनी रचला होता. अलिकडच्या काळात यात वाढ होताना दिसत आहे. त्यांनी स्वत:चं आयुष्य समाजासाठी वेचलं, मात्र, आता त्यांचा अवमान केला जात आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. कदाचित पर्यावरणासंबंधी काही अडचणी असतील, म्हणून स्मारकाचे काम होत नाही. पण महाराष्ट्रात राजभवनला ४८ एकर जागा आहे. तिथे शिवरायांचे विशाल स्मारक व्हावे, ही अनेकांची मागणी आहे. स्मारकाचे उदिष्ट्य असते की भावी पिढीला आपला इतिहास कळाला पाहिजे, स्मारकाच्या माध्यमातून भावी पिढी त्यातून प्रगतीचा विचार घेईल. मी आज शिभवक्तांच्या तर्फे मागणी करतो की राजभवनावरील शिवस्मारकाची घोषणा अमित शाह यांनी करावी”, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले.
दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे
यावेळी बोलतांना उदयनराजे म्हणाले की, “मी याआधी अमित शाहा (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती, बुद्ध सर्किट जसं आहे तसं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट असावे, ती मागणी कालच मान्य केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत स्मारक व्हावे, ही देखील मागणी आहे. दावणगिरी जिल्ह्यातील शहाजी महाराजांच्या समाधीसाठी केंद्र आणि राज्याने निधी उपलब्ध करुन द्यावा. अरबी समुद्रात स्मारकाचे भूमिपूजन झाले, माझी एक मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक दिल्लीत झाले पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली.
महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा होईल असा कायदा तयार करा
लोकशाहीचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला. ज्या शिवरायांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला. मात्र, त्यांचा अवमान केला जात आहे. त्यामुळे मी देशाच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेबांचा होणारा अवमान टाळण्यासाठी एक कायदा करावा. त्यात दोषींविरूद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करून दहा वर्ष जामिनच मिळू नये अशी मागणी करतो, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकडून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेंन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावे. जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे एक सेंसर बोर्डची देखील स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही उदयनराजे यांनी केली.