सातारा | Satara
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात सातारा गादीचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत उदयनराजे भोसले यांनी इतिहासातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला.
“सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीले तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचे महात्मा फुलेंनी अनुकरण केले. स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचे संविधान लिहीले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झाले” असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
या ऐतिहासिक उल्लेखांबरोबरच, उदयनराजे भोसले यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रगतीबाबतही चिंता व्यक्त केली. “कदाचित तांत्रिक किंवा पर्यावरण विषयक अडचणी असतील, पण जर त्या ठिकाणी अडचण असेल, तर अरबी समुद्रालगत अठ्ठेचाळीस एकर जागा उपलब्ध आहे. एवढ्या मोठ्या जागेत स्मारक उभारता येईल,” असे ते म्हणाले.
महापुरुषांच्या बाबतीत जरा कोणी अपमानास्पद बोलत असेल तर यासाठी कायदा केला जावा. शिवाजी महाराज यांचा शासनामार्फत ग्रंथ प्रकाशित झाला नाही तो व्हावा. तसेच सेन्सॉर बोर्डमध्ये इतिहासकार असायला हवा. शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे. अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक व्हावे तिथे शक्य नसेल तर गवर्नर हाऊसच्या जागेत व्हावे गवर्नरला जागा लागतेच किती? ४८ एकर जमीन आहे, तशी घोषणा व्हावी, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आणि इतर संबंधितांशी चर्चा केली असून, त्यांनी यावर स्पष्ट घोषणा करावी अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा सन्मान करताना सामाजिक सलोखा, स्त्री शिक्षण, आणि ऐतिहासिक स्मारकांच्या जपणुकीच्या गरजेवर भर देण्यात आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा