मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर युती आणि आघाडींमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळजवळ निश्चित झाले आहे.
याचदरम्यान विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची गुरूवारी ‘मातोश्री’वर बैठक पार पडली. ठाकरे गटाचे आमदार आणि काही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून एबी फॉर्म देण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी या उमेदवारांनी एबी फॉर्म न घेता मातोश्रीवरून रजा घेतली.
नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाच्या आमदारांची गुरुवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर बैठक बोलावण्यात आली होती. उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून नियमित तपासणी करून परतले आहेत. बैठकीच्या वेळी ते त्यांच्या शयनकक्षात विश्रांती घेत असल्याने आदित्य ठाकरे यांनीच या आमदारांशी संवाद साधला व मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेतला.
उपस्थित असलेल्या सर्वच आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याने ‘यादी जाहीर होण्याची वाट पाहू नका. आवश्यक औपचारिकता पूर्ण झाली आहे. उद्या किंवा त्यानंतर उद्धव ठाकरे तुम्हाला फॉर्म देणारच आहेत. त्यामुळे आजच तुम्ही फॉर्म घेऊन गेलात तरी चालेल’, असे आदित्य म्हणाले.
त्यावर ‘उद्धव साहेब ठणठणीत बरे होऊ द्या, आम्ही पुन्हा दोन दिवसांनी येऊ; पण एबी फॉर्म त्यांच्याच हातून घेऊ’, असे या सर्वांनी एकमुखाने सांगितले. त्यांच्या या शब्दाला मान देत आदित्य ठाकरे यांनीही त्याला होकार दिला. उद्धव ठाकरे यांनी तुम्हा सर्वांना मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचा निरोपही यावेळी आदित्य ठाकरे यांनी या आमदारांना दिला.
मातोश्रीवर उपस्थित आमदार
आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रमेश कोरगांवकर, सुनील राऊत, राजन साळवी, ऋतुजा लटके, संजय पोतनीस, कैलास पाटील, भास्कर जाधव, शंकरराव गडाख, वैभव नाईक, नितीन देशमुख, राहुल पाटील.
‘एबी’ फॉर्म म्हणजे नक्की काय?
एखाद्या विशिष्ट उमेदवाराला राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे हे ए व बी फॉर्मवरून सिद्ध होते. या दोन फॉर्मना एकत्रितपणे ‘एबी फॉर्म’ म्हणून ओळखले जाते. राजकीय पक्षाने तिकीट वितरणासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे, हे या दोन फॉर्मवरून स्पष्ट होते.
‘फॉर्म ए’ म्हणजे काय?
‘फॉर्म ए’ हा मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्याच्या राजकीय पक्षांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी आणि संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये केला जाणारा एक अधिकृत संवाद आहे. हा फॉर्म राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाकडून येतो; ज्यावर स्वाक्षरी आणि पक्षाचा शिक्का असणे आवश्यक असते. फॉर्मवर पक्षाने तिकीटवाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरीही आवश्यक असते. पक्षाकडून दिल्या जाणार्या ‘फॉर्म ए’मध्ये उमेदवाराचे नाव, त्यांचे पक्षातील पद आणि चिन्ह यांची माहिती असते. अनेकदा उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर तो बाद ठरतो. त्यामुळे सर्व कागदपत्रे योग्य असणे आवश्यक असते. अर्ज बाद झाल्यास पक्षाने जाहीर केलेला उमेदवार निवडणुकीतून बाहेरदेखील जाऊ शकतो.
‘फॉर्म बी’ म्हणजे काय?
‘फॉर्म बी’ हा उमेदवारासंदर्भातील असतो. राजकीय पक्षाच्या अध्यक्ष किंवा सचिवाने नेमलेल्या अधिकृत उमेदवारासह या फॉर्मवर पक्षाने सुचविलेल्या आणखी एका उमेदवाराचे नाव असते. ‘फॉर्म बी’मध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्यांना देण्यात येते. याच उमेदवाराला पक्षाचे चिन्ह दिले जावे, असे या फॉर्मद्वारे सांगण्यात येते. उमेदवाराच्या नामांकन प्रक्रियेत एखादा उमेदवार नाकारला गेला, तर त्याच्या जागी या फॉर्ममध्ये असणार्या दुसर्या उमेदवाराला संधी दिली जाते. ‘फॉर्म बी’ हेदेखील प्रमाणित करतो की, ज्या व्यक्तीला अधिकृत उमेदवारी दिली गेली आहे, ती राजकीय पक्षाची सदस्य आहे.